Search This Blog

Thursday, 27 April 2017

चला भविष्य घडवूया

मायक्रोसॉफ्ट च्या वतीने जगभरातील उपक्रमशील शिक्षकांचे जागतिक संमेलन नुकतेच टोरोन्टो येथे पार पडले. या संमेलनात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली होती.या परिषदेचा थोडक्यात आढावा.                  ‘एज्युकेशन एक्शचेंज’ हे शिक्षणविषयक जागतिक संमेलन म्हणजे जगभरातील तंत्रस्नेही शिक्षकांना आपले नाविन्यपूर्ण  उपक्रम जागतिक स्तरावर सादर करण्याचे हक्काचे ठिकाण.मायक्रोसॉफ्ट च्या वतीने  मागील १० वर्षापासून हे संमेलन आयोजित करण्यात येतेय.कॅनडाच्या १५० व्या स्वातंत्र्य वर्षाचे औचित्य साधून यजमान पदाचा मान टोरोन्टो ला मिळाला. जगभरातील  ३०० शिक्षकांना यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.भारतातील ८ शिक्षक यासाठी पात्र ठरले,यांपैकी ५ जण या संमेलनात प्रत्यक्ष सहभागी होवू शकले. शिक्षकांच्या उपक्रम निवडीची प्राथमिक प्रक्रिया दरवर्षी एप्रिल ते जुलै याकालावधीत पार पडते.यातून निवडले जातात  ते ‘मायक्रोसॉफ्ट इंनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्सपर्ट’. या प्राथमिक फेरीतून निवडलेल्या शिक्षकांचे देशपातळीवर सादरीकरण घेतले जाते,व देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट उपक्रम जागतिक संमेलनासाठी निवडले जातात.अर्थात ज्यांना या संमेलनात प्रत्यक्ष सहभागी होता येणार नाही त्यांच्याकरिता एक दिवसाचे सत्र थेट प्रक्षेपित केले जाते. शिक्षकांना अनेकविध प्रशिक्षणे, activities ,चर्चासत्र असा भरगच्च कार्यक्रम  जागतिक संमेलनासाठी आखलेला असतो . एका तासात आपल्या बोटाच्या आकाराचा सेन्सर तयार करण्याची activity यावर्षी हिट ठरली.या  संमेलनात  सहभागी शिक्षक आपापले उपक्रम सादर करतात. इतर देशातील ज्या शिक्षकांचे उपक्रम आपल्याला आवडतील त्याच्यासोबत ते  शिक्षक सामंजस्य करार करून त्या उपक्रमाची अंमलबजावणी त्यांच्या शाळेत  करू शकतात.अनेक शिक्षक पुढील शैक्षणिक वर्ष्यात राबवायच्या सामुहिक उपक्रमांची आखणी देखील इथे करत असतात. इतर देशातील शिक्षकांशी प्रत्यक्ष  संवाद साधण्याची,त्यांच्यासोबत गटकार्य करण्याची ,  त्यांचे काम जवळून पाहण्याची  संधी यानिमित्ताने मिळत असते. विद्यार्थ्याच्या मानसिकतेतून या संमेलनात सहभागी झालात तर खूप काही शिकण्याची संधी मिळत असते.
                               ‘चला भविष्य घडवूया’ ही यावर्षीच्या संमेलनाची थीम. शिक्षण क्षेत्रात भविष्यात येणाऱ्या समस्या कोणत्या? भविष्यासाठी शैक्षणिक तंत्रज्ञान कसे असेल? भविष्यात शिक्षकांची भूमिका काय असेल? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या संमेलनात झाला.दरवर्षीच्या थीमवर आधारित एक स्पर्धा देखील यादरम्यान आयोजित केली जाते. वैयक्तीक व सामुहिक अशा दोन गटात ही स्पर्धा रंगते.कोणतीही एक शैक्षणिक समस्या निवडून त्याचे निराकरण कसे करता येईल? याचे सादरीकरण वैयक्तिक व सामूहिकरीत्या करण्याची संधी प्रत्येकाला मिळत असते. आमच्या गटात अमेरिका,केनिया,इजिप्त व जपान या देशातील शिक्षक होते. संमेलनात सहभागी शिक्षकांची संख्या पाहता या संमेलनावर महिला शिक्षिकांचा वरचष्मा असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. दरवर्षीदेखील महिला  शिक्षिकांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त असल्याचे आयोजकांचे निरीक्षण आहे.जगभरातील  महिला शिक्षिकांची शिक्षकी पेशाप्रती असणारी व्यावसायिकता मला  अनुकरणीय वाटते . सहभागी शिक्षकांच्या शाळांचे वर्गीकरण अभ्यासले असता सरकारी शाळांतील शिक्षक संख्या जास्त असल्याचे दिसून आले.भारताच्या तुलनेत प्रगत समजल्या जाणाऱ्या अनेक देशात सरकारी शाळांमधील शिक्षण हे सर्वोत्तम दर्ज्याचे असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. दर्जेदार शिक्षण मिळणे हा मुलांचा हक्कच आहे अशी त्या देशांतील शिक्षकांची भावना आहे.शिक्षक म्हणून कालानुरूप व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याकडे बहुतांश देशातील शिक्षकांचा कल असल्याचे जाणवले.विशेष म्हणजे  व्यावसायिक कौशल्ये  विकसित करणे ,परदेशातील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करणे याकरिता   ऑस्ट्रिया व ट्युनिशिया या देशांनी शिक्षकासाठी विशेष निधी राखून ठेवला आहे.  संमेलनात सहभागी शिक्षकांशी केलेल्या संवादातून एक बाब निदर्शनास आली ती म्हणजे  प्रशासनाकडून वारंवार मागितल्या जाणाऱ्या  माहितीमुळे अविकसित व विकसनशील देशातील शिक्षक त्रस्त आहेत . विकसित देशांनी मात्र  उपलब्ध माहितीचे पृथ्थकरण व संस्करण करण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. लहान मुलांना वर्गात tab वापरू द्यावे कि नाही ? याबाबत   मतभिन्नता असली तरी शिक्षकांनी मात्र tab/laptop  वापरावा यावर मात्र  एकमत झाले .  जगभरातील शिक्षकांना  वर्ग अध्यापनात जाणवणाऱ्या समस्यांमध्ये पुष्कळसे साम्य आहे.या समस्यांवर शोधलेले उपाय व्यक्तिपरत्वे ,  राष्ट्र्परत्वे वेगवेगळे  असले तरी देखील एकाच समस्येवर किती वैविध्यपूर्ण उपाय शिक्षक शोधू शकतात हे अशा संमेलनातून अनुभवता येते.मुळात शिक्षण क्षेत्रात  तंत्रज्ञान वापरायचे म्हणजे नेमकं काय करायचं असत? याच उत्तर या शिक्षकांशी केलेल्या गटकार्यातून मिळाले. केवळ tab वा प्रोजेक्टरवर विशिष्ट app चा वापर करणे , व्हिडीओ दाखवणे या  पलीकडेदेखील तंत्रज्ञान वापरता येते हे आम्ही - भारतीय शिक्षकांनी, समजून घ्यायला हवे. मुलांच्या अध्ययन क्षमतेचे मापन करून , प्राप्त माहितीच्या आधारे सुयोग्य निष्कर्ष काढण्यासाठी तंत्रज्ञान वापरले जावे असे बहुतांश शिक्षकांचे मत आहे.अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही  कोणत्या क्षमता विकसित करत आहोत ?  याचा विचार करायला हवा. एकीकडे गणित , बुद्धिमत्ता चाचणी च्या पेपर मधून स्कॉलर निवडण्याकडे आमच्या शिक्षकांचा कल वाढत आहे , तर दुसरीकडे लहान वयातच कोडींगच्या माध्यमातून मुलांची तर्कक्षमता विकसित करण्याकडे वेली हेल्ट सारख्या शिक्षकांचा कल आहे . दोन्ही देशातील  शिक्षकांना त्यांच्या शाळेतील मुलांची तर्कक्षमताच  विकसित करायची आहे, मात्र यासाठी त्यांनी निवडलेले मार्ग भिन्न दिसून येतात.अन या शिक्षकांनी निवडलेल्या  वेगवेगळ्या उपायांमध्ये त्या - त्या देशांच्या मनुष्यबळ विकासाचे रहस्य लपलेले आहे. एकीकडे २१व्या वर्षात पदार्पण केलेली भारतीय मुलगी तिच्या  लग्नाचा  खर्च वडिलाना कर्जाच्या खाईत घेवून जाईल असे कारण देत  आत्महत्येचा मार्ग निवडत आहे ,  तर दुसरीकडे वेली हेल्ट या शिक्षकाची यांची मुले २०व्या वर्षी नासा सारख्या संस्थेत आपले शैक्षणिक उपयोजन करत आहेत  ,  कॉर्पोरेट   परीभाषेत  सांगायचे तर ती ‘एम्प्लॉएबल’  झालेली आहेत.. देशाचे भावी नागरिक म्हणून मुलांची विचार क्षमता आम्ही कोणत्या साधनांचा, तंत्रज्ञानाचा  अवलंब करून कोणत्या मार्गाने विकसित करत आहोत ? याचे उत्तर आम्हा शिक्षकांनाच द्यावे लागेल.
रणजितसिंह डिसले.Tuesday, 7 March 2017

‘ ती सध्या काय करते ? : एक संवाद प्रगल्भतेचा '

  
                      
              
                    भारतातील महिला ऑलींपिकपटू  राज्य सरकारने जाहीर केलेल्या बक्षिसाची रक्कम  न मिळाल्यामुळे  नाराज असताना अमेरिकेतील ऑलींपिकपटू सध्या काय करतात ? हा प्रश्न सहजच मनात डोकावला. अन शोध सुरु झाला अमेरिकेतील‘ती’चा. Classroom Champions ने याकामी आम्हाला सहकार्य केले. अन मेरील डेविस ही खेळाडू आमच्या शाळेत अवतरली.मेरील डेविस या ऑलींपिक पदकविजेत्या खेळाडूला  आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला , आमच्या जि.प.कदमवस्ती शाळेत आमंत्रित करण्यात आले होते.मेरील ही अमेरिकेची २७ वर्षीय Ice Ball Skitter असून दोन वेळा ऑलींपिक पदक मिळवले आहे.अर्थात अमेरीकेतील ही खेळाडू अन आमच्या शाळेतील मुले यांचा संवाद रंगला तो ‘skype’ च्या माध्यमातून.
           “मेरील तू सध्या काय करतेस?”  हाच प्रश्न चर्चेच्या सुरवातीलाच  विचारला. मला वाटलं सुवर्णपदक विजेती ही खेळाडू एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये लठ्ठ पगारावर कार्यरत असेल.मात्र तसे काहीच नव्हते. ती सध्या मिशिगन विद्यापीठात Anthropology या विषयात  पदवीचे शिक्षण घेत असून शेवटच्या वर्ष्यात शिकत आहे.तिच्या या उत्तराने मी काहीसा अचंबित झालो. “तूझा चरितार्थ कसा चालवतेस?” असे विचारले असता ती डान्स शो करत असल्याचे तिने सांगितले. सन  २०१० सालच्या हिवाळी ऑलींपिक मध्ये तिने तिच्या जीवनातील पहिले ऑलींपिक पदक मिळवले, तेही वयाच्या २३ व्या वर्षी. सन २०१४ मध्ये रशियातील साची येथील ऑलींपिक मध्ये तिने सुवर्णपदक मिळवले आहे. अशी दैदिप्यमान कामगिरी करणारी खेळाडू आज विद्यापीठात शिक्षण घेत असून डान्स शो देखील करते.पदक मिळाल्यानंतर तिला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा यांना भेटण्याची संधी मिळाली. काही संघटनानी तिचा सत्कार केला, याच्यापलीकडे तिला काहीच मिळाले नाहीये. तिची अपेक्षाही नाही , कि तिला अजून काहीतरी मिळावे. ऑलींपिकमध्ये पदक मिळवले कि सरकारने काहीतरी दिलेच पाहिजे असा कोणताही अविर्भाव तिच्याकडे नाही. ती सध्या काय करते ? याचे उत्तर मला मिळाले होते.
                          मेरीलला आपला भारत देश खूप आवडतो.भारतीय पदार्थ तिच्या घरी बनवले जातात.पनीर टिक्का व आमरस हे तिचे आवडते भारतीय पदार्थ.सकाळची वेळ साधून मी तिला माझ्या डब्ब्यातील शिरा खाण्याचा आग्रह केला. तिला तो कॅमेऱ्यासमोर नेवून दाखवलादेखील.मात्र तिला तो खाता आलाच नाही.( अजूनतरी असे तंत्रज्ञान आमच्या शाळेत उपलब्ध  नाहीये, नाहीतर तिला शिरा खाता आला असता.) भारतीय संगीत तिला आवडते. बॉलीवूडच्या चित्रपटातील संगीत खूप उत्साहवर्धक असल्याचे तिचे म्हणणे आहे. ‘देवदास’ हा तिचा आवडीचा चित्रपट आहे. तिला मिळालेले पहिले ऑलींपिक पदक तिने बॉलीवूड गाण्यावर स्केटिंगकरूनच मिळवले आहे. हे सांगत असताना तिने तिच्या ‘त्या’ कामगिरीचा व्हिडीओ share केला.पुढील लिंकला क्लिक करून तुम्हीदेखील तो पाहू शकता https://www.youtube.com/watch?v=XUzchzkitdQ. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारी ही खेळाडू इटालियन भाषादेखील अस्खलितपणे बोलते. इटालियन भाषेतील दोन वाक्ये तिने उच्चारली पण आम्हाला ती काहीच न समजल्यामुळे परत त्याचे भाषांतर करून सांगितले. तिचे हे भाषाविषयक प्रेम पाहून मलाही रहावले नाही अन मी देखील हिंदी अन मराठीतील दोन-दोन  वाक्ये तिच्याकडून वदवून घेतली. ‘मी चांगली आहे’ हे उच्चारताना तिला स्वतःलाच खूप आनंद झाला. मुलांनी मराठीतून विचारलेल्या प्रश्नाला तिनेदेखील मराठीतूनच उत्तर दिले अन आनंदाच्या भरात स्वतःच टाळ्या वाजवल्या.अशी ही जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी खेळाडू.
                       ऑलींपिकच्या तयारीविषयी ती भरभरून बोलली.घराजवळच असणारे तळे हिवाळ्यात गोठून जायचे अन तयार झालेल्या बर्फावर ही चिमुकली मेरील स्केटिंग करत असे.त्या वयातच तिला स्केटिंग आवडू लागले.क्रेग सोबत ती मागील १७ वर्ष्यांपासून सराव करत आहे. रोज सकाळी ७ ते १ पर्यंत सराव,दुपारी कॉलेज अन सायंकाळी जीम असा तिचा दिनक्रम असतो. ती २०१८ सालच्या ऑलींपिक मधे सहभागी होणार नाहीये,मात्र तरीही तिचा हा दिनक्रम चुकलेला नाही. शिक्षण पूर्ण करण्याच्या हेतूने ती २०१८ च्या ऑलींपिक मध्ये सहभागी होणार नाहीये.तिने तिच्या डायरी मधील एक पान आमच्याशी share केले,ज्यात तिने तिचे गोल सेटिंग कशाप्रकारे केले अन ते साध्य करताना आलेल्या अडचणी याबद्दल लिहिले आहे. मुलांना तिने एक महत्वाची बाब सांगितली , ती म्हणजे कोणतेही ध्येय गाठताना छोटी छोटी उद्दिष्टे ठरवा, ती टप्प्याटप्प्याने गाठत पुढे चला.सातत्यपूर्ण प्रयत्नांनी ध्येय गाठता येते हा तिचा स्वानुभव आहे.

संवादाच्या  शेवटच्या टप्प्यात आमच्या मुलांनी तिला पर्वतासन,ताडासन व  पश्चिमोत्तानासन ही आसने करून दाखवली. चिमुकल्या मुलांची ही लवचिकता पाहून ती स्तब्ध झाली.मुलाच्या या  कृतींमधील सहजेबाबत तिने अधिक जाणून घेतले. तिला आमचा हा योगा क्लास खूप आवडला.भारतातून तिला आंबे पाठवण्याचे निश्चित करून आमच्या या संवादाचा समारोप झाला. आजवर २३ देशांचा आभासी दौरा केलेली आमची चिमुकली टीम वाट पाहतेय पुढच्या देशाची. लवकरच भेटूयात . तूर्तास थांबतो.

रणजितसिंह डिसले
onlyranjitsinh@gmail.comSaturday, 28 May 2016

तंत्रस्नेही शिक्षणाचा ‘ब्राझिलियन’ प्रयोग @ @ रणजितसिंह डिसले
                                      ब्राझील म्हटले कि लगेच फुटबॉल आठवतो.पेले,रोनाल्डो सारखे  आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणजे या देशाने जगाला दिलेली देणगीच.पण आज ब्राझील ची एक वेगळी ओळख जगासमोर आली आहे.एप्रिल  २०१६ मध्ये या देशाने माध्यमिक स्तरावरील सर्वच बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे उद्दिष्ट गाठणारा जगातील पहिला देश हा बहुमान मिळवला आहे.संयुक्त राष्ट्र संघाने नुकत्याच प्रकशित केलेल्या अहवालात या प्रयोगाची विशेष दखल घेतली गेली आहे. याच प्रयोगाची ओळख करून देणारा हा लेख.
                                      सेंट लुईस हा अमेझॉन च्या खोऱ्यात वसलेल्या खेड्यात राहणारा मुलगा.गावात एकूण २० कुटुंबे अन लोकसंख्या ७६.लुईस अन त्याचा मित्र फर्नांडीस  हे दोघे यावर्षी ११ वी मध्ये शिकत आहे.त्यांच्या गावातील हे दोघेच  उच्च शिक्षित युवक.10 वर्षापूर्वी ची परिस्थिती मात्र वेगळी होती.माध्यमिक शिक्षण घ्यायचे असेल तर लुईस समोर दोनच पर्याय होते.एक म्हणजे १०० मैल दूर असणाऱ्या शहरात जाणे—जिथे पोहचायला तब्बल २ आठवडे लागतात,किंवा मग शिक्षण सोडून देणे.माध्यमिक स्तरावर होणारी गळती हा ब्राझील च्या सरकार समोरचा चिंतेचा प्रश्न होता.ही गळती रोखण्यासाठी सरकारने अंमलात आणलेला कृती  आराखडा म्हणजेच ‘तंत्रस्नेही शिक्षणाचा ब्राझिलियन  प्रयोग’.
                                      सन २००९ साली आपला  भारत देश १४ वर्षाखालील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा कायदा केला म्हणून आनंदोत्सव साजरा करत होता , त्याच वर्षी ब्राझील ने माध्यमिक स्तरावरील मुलांना  गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारा कायदा केला अन याची  उदिष्टे गाठण्याची कालमर्यादा सन २०१६ अशी ठरवण्यात आली.ब्राझील च्या कायद्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण हा मुलभूत घटक मनाला गेला.तसेच निश्चित कालमर्यादेत हे उदिष्ट साध्य करावयाचे असल्याने विचार व कृती यांमध्ये एकवाक्यता साधली गेली. अमेझॉन च्या खोऱ्यात वसलेल्या २३०० खेड्यातील तब्बल ३,००,००० मुलांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्यात ब्राझील ला यश आले आहे.माध्यमिक स्तरावर होणाऱ्या गळती मागील महत्वाचे कारण होते – माध्यमिक स्तरावरील शिक्षणासाठी करावा लागणारा शेकडो मैलांचा प्रवास.यावर उपाय म्हणून ही मुले ज्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होती त्याच शाळेत माध्यमिक शिक्षणासाठी थेट प्रक्षेपण केंद्रे उभारण्यात आली.सरकारी मालकीची दूरचित्रवाहिनी ,उपग्रह सेवा पुरवठादार  व स्थानिक केबल चालक यांच्या मदतीने पहिल्या टप्प्यात  तब्बल २३०० खेड्यामधील शाळेत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.केवळ पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर हा देश थांबला नाही तर थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून शिक्षण देण्याच्या यापूर्वीच्या अयशस्वी प्रयोगांवर मात कारणासाठी विशिष्ट कार्ययोजना आखली गेली.ब्राझील मधील विख्यात शिक्षणतज्ञ,बालमानसशास्त्रज्ञ व शिक्षण शास्त्र अभ्यासक यांच्या मदतीने असे शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी वेगळा अभ्यासक्रम तयार केला गेला.या मुलांची भौगोलिक परिस्थिती,परंपरा,बोलीभाषा,पालकांचे व्यवसाय यांच्या  अभ्यासातून  व्यवसायाभिमुख कौशल्ये विकसित करत   शिक्षणातून अर्थार्जन हे उदिष्ट साध्य करणारा अभ्यासकम आखला गेला. कौशल्याधीष्ठीत  अभ्यासक्रमाच्या आखणी नंतर थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी ब्राझील मधील सर्वोत्कृष्ट ५० शिक्षकांची निवड केली गेली. अमेझॉन ची राजधानी मानौस मधील केंद्रातून हे शिक्षक रोज ४ तास अध्यापन करत राहिले. हे थेट प्रक्षेपण ज्या शाळेत दाखवले जात होते त्या शाळेतील शिक्षकांना वर्ग व्यवस्थापन (Classroom-Management ) व  मूल्यमापनाचे (Evaluation) चे विशेष प्रशिक्षण देण्यात आले.थेट प्रक्षेपण वर्ग रटाळ न होता अधिक परिणामकारक होण्यासाठी द्विमार्गी संवादाची सुविधा देखील पुरवण्यात आली.यामुळे कोणताही विद्यार्थी त्याला आलेली अडचण तज्ञ मार्गदर्शकाना विचारू शकत होता.त्यामुळेच हे अध्यापन अधिक प्रभावी ठरले.पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या मुल्यमापनाला फाटा देत कौशल्याधारित मुल्यमापनाचा  अवलंब करण्यात आला.मुलांचे मूल्यमापन हे सार्वत्रिक न करता ते वैयक्तिक करण्यात आले.त्यामुळे प्रत्येक मुलाच्या प्रगतीच्या आलेखाची तुलना इतरांशी होण्याचा धोका टाळला गेला. प्रत्येक आठवडा अखेर या प्रत्येक मुलाच्या आठवड्यातील कामगिरीचा आढावा घेवून पुढील आठवड्यातील पाठ्य्क्रमाची आखणी केली गेली.  प्रत्येक शाळेला पुढील आठवड्याचे वेळापत्रक अगोदरच पाठवले जाई त्यामुळे तेथील शिक्षकांना वर्ग व्यवस्थापन करणे अधिक सुलभ जाई.
                                         सलग ३ वर्षे याची अंमलबजावणी केल्यानंतर याची उपयुक्तता पाहून ब्राझील मधील इतर ६ राज्यांनी देखील याच मॉडेलचा स्वीकार केला.मागील 10 वर्षे हा प्रयोग सुरळीत सुरु आहे.याचाच परिणाम म्हणून संयुक्त राष्ट्राने  ब्राझील मधील  एक ही मूल  माध्यमिक स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित नाही असे प्रशस्तीपत्र दिले.संयुक्त राष्ट्राने घोषित केलेली शाश्वत विकासाची   उद्दिष्टे   गाठण्यासाठी सारे जग प्रयत्न करत असतानाचा ब्राझीलच्या या यशाने सर्वांसमोर आदर्श उभा राहिला आहे.
                                        लोकसंख्या व अर्थव्यवस्थेचा आकार याबाबत भारताशी काही प्रमाणात साम्य असणारा हा देश जे यश साध्य करू शकला ते आपल्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.ब्राझीलच्या या शैक्षणिक मॉडेल मधील बऱ्याच बाबी आपल्या देशाला मार्गदर्शक आहेत.जिथे वैद्यकीय शिक्षणासाठी सबंध भारतभर  ‘नीट’ नेटकी परीक्षा असावी असा आग्रह आम्ही धरत असतानाच स्थानिक गरजांचे प्रतिबिंब अभ्यासक्रमात उमटले तर त्याची उपयुक्तता वाढते हेच ब्राझील च्या नव्या मॉडेल ने  दाखवून दिले आहे.पारंपारिक शिक्षण व अभ्यासक्रम यांची वास्तविक जीवनाशी असणारी फारकत या निमित्ताने पुढे आली आहे.महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे मराठवाड्यातून दरवर्षी लाखो मुले उसतोडीच्या निमित्ताने किमान ६ महिन्यासाठी शाळाबाह्य राहतात. या मुलांच्या गरजा, कौटुंबिक परिस्थिती यांचा अभ्यास करून  वेगळा  अभ्यासक्रम आखला जाणे गरजेचे आहे.बीड सारख्या जिल्ह्यात या धर्तीवर पथदर्शी प्रयोग राबवता येवू शकेल.या पायलट प्रोजेक्ट मधील येणाऱ्या समस्यांचा अभ्यास करून काही उपाय निश्चितपणे समोर येतील.या पर्यायांची उपयुक्तता पडताळून मगच  याचे सार्वत्रिकीकरण केले जाणे उचित ठरेल.मुलांचे होणारे स्थलांतर व गळती रोखण्यासाठी पालकांचे मन वळवण्याचा पर्याय दरवर्षीच लागू पडेल  याबाबत शंकाच वाटते.मात्र साखर शाळांचे पुनरुज्जीवन करून तिथे या मुलांच्या गरजानुरूप अभ्यासक्रम आखून त्याच्या अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाऊ शकेल.केवळ शैक्षणिक सुविधा पुरवण्यात RTE चे यश मानणे म्हणजे अल्प संतुष्टपणा ठरेल.शैक्षणिक सुविधांची उपलब्धता याही पुढे जाऊन आपल्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करायला हवीय.. ब्राझीलचा हा पॅटर्न आपल्या गरजानुरूप बदल करून अंमलात आणायला काहीच हरकत नाही. स्थलांतर स्थानिक गरजा लक्षात घेत अर्थार्जनासाठी शिक्षण देण्याबाबत आम्हा भारतीयांना विचार करावा लागेल.असे शिक्षण देताना ते अधिक लवचिक असण्याची गरज आहे.संगणक,टॅबलेट आदी साधनाच्या   मदतीने तंत्रस्नेही शिक्षण देण्यात बाबत आपला देश गोंधळलेल्या  अवस्थेत असताना ब्राझील चे तंत्रस्नेही  प्रारूप मार्गदर्शक आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून घनदाट जंगलात देखील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गंगा अव्याहतपणे वाहू शकते हे यातून दिसून येते. प्रचंड पाऊस व महापूर  हा जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या अमेझॉन मधील मुलांच्या अभ्यासक्रमात आपत्ती व्यवस्थापन,पर्यावरण संरक्षण यांचा जाणीवपूर्वक समावेश केला गेला. विषारी साप ओळखणे व साप पकडण्याचे तंत्र  अवगत करण्यासाठी सिम्युलेशन ची मदत घेतली गेली.त्यामुळे सर्प दंशाने मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण ब्राझील मध्ये लक्षणीयरीत्या घटले आहे, असेही निरीक्षण संयुक्त राष्ट्राने नोंदवले आहे.मुलांना शाळेत शिकण्यासाठी त्यांचे सामाजिक अभिसरण होणे महत्वाचे असते हा आपला भारतीय समज देखील यानिमित्ताने फोल ठरला आहे.कारण अमेझॉन मधील अनेक शाळांमध्ये केवळ २-४ मुलेही शिक्षण घेत आहेत.मुलाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत शिक्षण असेल तर ते शाश्वत शिक्षण ठरते हेच या निमित्ताने समोर आले आहे.
रणजितसिंह डिसले

onlyranjitsinh@gmail.com

Tuesday, 1 March 2016

भारतीय समाजमन ....रणजितसिंह डिसले


                     ‘15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला’;इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील  या विधानाची सत्यताच प्रश्नांकित व्हावी असे सामाजिक वर्तन मागील काही वर्षात  दिसून येत आहे. हा देश स्वतंत्र झाला कि निव्वळ राजकीय , आर्थिक व न्यायिक बाबतीत सत्तांतर घडून आले ? असा प्रश्न मनात येतो.सत्तांतर म्हणण्यामागे या क्षेत्रातील इंग्रजाळलेली विचारधारा आहे. राजकीयदृष्ट्या निर्णय घेताना आजही इंग्रज राजवटीतील प्रक्रिया अवलंबली जात आहे.प्रशासनात जबाबदारीचे तत्व लागू करण्यात आपण अयशस्वी ठरत आहोत.आजही आपली न्यायव्यवस्था आंधळी बनून राहिली आहे.ज्या न्याय व्यवस्थेने जनरल डायर ला जालियानवाला बाग हत्याकांडातून निर्दोष मुक्त केले ,तीच न्यायव्यवस्था सलमान खान ला देखील निर्दोष मुक्त करते. कायद्यासमोर सर्वजण समान असतात;काहीजण अधिक समान असतात.या विधानाची प्रचिती आजही वारंवार येतच राहते.भारतीयत्वाचा ठसा असणारी  डोळस न्यायव्यवस्था आपण निर्माण करू शकलो नाही.न्याय देवता आंधळी असणे हे इंग्रजांचा फायद्याचे होते ;भारतीयांच्या नव्हे.इंग्रजांचे अंधानुकरण व अनुकरणप्रीयता हा आपला स्थायीभाव देशहिताला घातक ठरतोय.
                    जी बाब धोरणकर्त्यांची तीच आपल्या नागरिकांची.  स्वतंत्र देशातील नागरिकांप्रमाणे भारतीय नागरिक कोणत्याही  घटनेला प्रतिसाद देत नाहीत हे वारंवार दिसून येत आहे.इंग्रज कालावधीतील भारतीय नागरिकांचे वर्तन व सध्यस्थितील वर्तन यांमध्ये  खूपच साम्य आढळते. इंग्रज कालावधीत सरकारी व्यवस्था खीळखिळी करण्याकडे आंदोलनकर्त्या  भारतीय नागरिकांचा कल असायचा.आजही आपण सरकारी यंत्रणेला जेरीस आणून मागणी मान्य करण्याकडेच  अधिक वेळा झुकतो. ही मागणी मान्य करून घेत असताना त्या विशिष्ट समुदायामध्ये देखील  दोन विचारप्रवाह प्रकर्षाने जाणवतात.ते म्हणजे मवाळ  व जहाल विचार प्रवाह.प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या प्रारंभिक स्थितीत हा मवाळ  गट प्रभावी राहतो. अर्ज,निवेदने,उपोषण या मार्गाने या मवाळ गटाचे प्रयत्न सुरु असतात.या कालावधीत जहाल विचारसरणीचे  लोक काहीसे सुप्तावस्थेत राहतात . मात्र मवाळ गटाच्या प्रयत्नांना प्रशासनाचाही मवाळ प्रतिसाद पाहून मग हा जहाल गट अधिकच सक्रीय होतो अन जाळपोळ,बंद,दंगल अशा मार्गांचा अवलंब करून आपली मागणी पुढे रेटण्याचा आक्रमक प्रयत्न करतो.आश्चर्याची  बाब अशी कि भारतीय प्रशासन देखील या जहाल विचारसरणीला तात्काळ प्रतिसाद देते.पुढे जाऊन हा प्रश्न सुटलाच तर मग जहाल विचारांनीच प्रश्न सुटतो हा संदेश समाजात जातो.याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जाट समुदायाचे आंदोलन.जाट समुदायाच्या आरक्षण संदर्भातील  आंदोलनाचा प्रवास देखील याच दिशेने सुरु आहे.आपल्या स्वातंत्र्य लढ्याकडे ही नजर टाकली तर हीच पद्धत अवलंबल्याचे दिसून येते.स्वातंत्र्य मिळवण्याचा अखेरचा हल्ला म्हणूनच ‘चले जाव’ चा एल्गार महात्मा गांधीजीनी पुकारला होता.

                        मात्र जहाल विचारसरणीचा गट हा देश  स्वतंत्र आहे  हेच विसरतो असे वाटते. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सार्वजनिक मालमत्तेची हानी करताना देखील जहाल गट सिलेक्टिव्ह होता.इंग्रज सरकारच्या मोक्याच्या ठिकाणांना ते लक्ष करत असत.जेणेकरून भारतीय नागरिक वा इंग्रज सेवेतील भारतीयांना त्रास होवू नये.त्यावेळी  राष्ट्र भावना अधिक प्रबळ होती.इंग्रज कालखंडात भारतीय नागरिकांनी बहिष्कार घातला  तो इंग्रजांच्या विदेशी कपड्यांवरच. मात्र आजही आपण आपल्याच सरकारी मालमत्तांचे नुकसान करत राहतो.एसटी गाड्यांच्या काचा फोडताना या आपल्याच देशाच्या गाड्या आहेत व या आपल्याच सोईसाठी आहेत हे विसरूनच आपण उग्र वर्तन करतो. आपण राष्ट्रभावना  विसरत चाललो आहोत असे वाटते. जाट समुदायासारख्या  उग्र आंदोलनाने आपण आपल्याच पायावर दगड मारून घेत आहोत.भारतासारख्या विकसनशील देशाचे विकसित देशात रुपांतर न  होण्यास आपले वर्तन कारणीभूत ठरतेय का? याचा विचार  करूया. या देशाच्या प्रगती मधील अडथळे आपणच आहोत. आपले जनजीवन विस्कळीत करण्याचे काम आपणच करत आहोत.आपल्यातील भारतीयपणा हरवत आहे असे वाटते.जाट समुदायाच्या आंदोलनकर्त्यांनी दिल्लीकरांचे पाणी अडवणे ही कृती याच मानसिकतेचे दर्शक आहे.अन हा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी लष्कराला यावे लागणे ही तर त्याहून मोठी  शोकांतिका  मानावी लागेल. शत्रू  सैन्यावर गोळीबार करत  सीमेचे रक्षण करण्याऐवजी आपल्याच देशातील नागरिकांवर गोळीबार करण्याची वेळ लष्करावर यावी हे आपल्या  राजकीय यंत्रणेचे अपयश आहे. जगातील किती देशातील लष्कराला आपल्याच देशातील नागरिकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले जात असावेत ? याचा विचार राज्यकर्त्यांनी करणे गरजेचे आहे.आपली मागणी मान्य करण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करताना  आपण निरपराध  भारतीय नागरिकांचा बळी   का घेतो  ? या कृतीमागील निश्चित कारण  शोधावे लागेल.
                                 दुसऱ्या बाजूला प्रशासनाला देखील निर्णय घेताना इंग्रजांळलेल्या मार्गांचाच अवलंब करावसा वाटणे आश्चर्यकारक  आहे.मागणीची तीव्रता वाढल्याशिवाय प्रतिसाद न देण्याकडेच प्रशासनाचा कल दिसून येतो.कोणत्याही प्रश्नावर प्रारंभिक स्थितीत च  तोडगा काढण्यात प्रशासन वारंवार अपयशी ठरत आहे.मवाळाच्या  अपयशायामुळे कदाचित जहाल विचारांना पाठबळ मिळत असावे. मात्र देशहित लक्षात घेतले तर जहाल विचारसरणी ने प्रश्न सोडवले जाणे   चिंताजनक आहे.जपानसारख्या स्वतंत्र देशात कामगारांना त्यांच्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर ते निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ काम  करून प्रशासनावर दबाव वाढवतात. कोणत्याही परिस्थितीत  ते राष्ट्रहिताला प्राधान्य देतात. आपण मात्र आजही इंग्रजाळलेल्या मानसिकतेत राहतोय.आपले विचार,कृती ही देशहिताला पूरक आहे कि घातक याचा विचार आंदोलनकर्तां समाज करत नसल्याचे दिसून येते.

                                       एक स्वतंत्र देश म्हणून आपल्याला  वेगाने वाटचाल करावी लागेल.राजकीय असो वा न्यायिक , बाबतीत भारतीयत्वाची स्वतंत्र ओळख निर्माण करावी लागेल.देशाचे भविष्य ज्या वर्गखोल्यांमध्ये घडवले जात आहे तिथे राष्ट्रभावना अधिक प्रबळ असणारे नागरिक घडवले जाणे गरजेचे आहे. काही मुठभर गटांच्या राजकीय विचारांना तीरांजली देण्याची मानसिकता असणारा समाज घडवला जाणे देशहिताचे आहे.स्वातंत्र्यापूर्वीच्या कालखंडात इंग्रजांनी जातीय राजकारण करणे ही त्यांची राजकीय आगतिकता असेलही  .पण स्वातंत्र्यानंतरही राज्यकर्त्यांनी याच मार्गाचा वापर सत्ता टिकवण्यासाठी करणे हे  आपले राजकीय अपयश आहे. 21 व्या शतकात देखील भारतीय समाजाने अशा जातीय राजकारणाला बळी पडावे , हे भारतीय समाजाच्या अपरिपक्वतेचे दर्शक  आहे.भूतकाळातील यादवी युद्ध,जहाल विचार यांना मागे सारत  इतिहासाची दुसरी बाजू समोर आणून तशा विचारसरणीचे नागरिक घडवण्यास प्राधान्य दिले गेले पाहिजे.बालभारतीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यविषयक पाठ समाविष्ट करण्याची शिक्षणमंत्र्यांची  घोषणा हे त्या दिशेने पडलेले एक स्वागतार्ह पाउल मानावे लागेल.अशा सामुहिक प्रयत्नांनीच  हा देश  खऱ्या अर्थाने स्वतंत्र होण्याकडे वाटचाल करत राहील असा विश्वास वाटतो.

  रणजितसिंह डिसले
(onlyranjitsinh@gmail.com)
ता.क. आंदोलनकर्त्या नागरिकांवर थेट गोळीबार करण्याऐवजी त्यांना बेशुद्ध करणाऱ्या Tranquillizer gun चा वापर करण्याच्या  पर्यायावर लष्कराने नक्कीच विचार करावा.

पाठ्यपुस्तकाचं तंत्र-मंत्र

पाठ्यपुस्तकाच तंत्र-मंत्र


                       

Saturday, 20 February 2016

QR coded Text Books

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महासत्ता म्हणून भारत देशाने आपला दबदबा कायम राखला आहे.सत्या नाडेला , सुंदर पिचाई यांसारखे कित्येक भारतीय नागरिक अनेक जगप्रसिद्ध कंपन्यांची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत.तंत्रज्ञान क्षेत्रात आपण आघाडीवर असलो तरी हे तंत्रज्ञान  भारताच्या ग्रामीण भागात मात्र कासव गतीने मार्गक्रमण करत आहे.याला पायाभूत सुविधांची अनुपलब्धता कारणीभूत  असो वा नागरिकांची अनास्था.मात्र या दोन्ही समस्यांवर मात करत ‘power to empower ’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवत ‘डिजिटल इंडिया ‘ ची घोषणा करण्यात आली.अनेक खाजगी संस्था नानाविध सुविधा त्यांच्या ग्राहकांना तंत्रज्ञानाच्या  सहायाने पुरवत असताना सरकारने देखील मागे न राहण्याचे ठरवले असावे.आज महाराष्ट्र सरकारने देखील जवळपास 150 सेवा online पद्धतीने पुरवण्यास सुरवात केली आहे.या डिजिटल इंडिया मधील डिजिटल नागरिकांना घडवण्याचे कार्य ज्या वर्ग खोल्यांमध्ये चालते तिथेदेखील तंत्रज्ञान वापरास सुरवात झाली आहे.अनिल सोनुने,बालाजी जाधव सारखे शिक्षक या डिजिटल चळवळी चे नेतृत्व खंबीरपणे सांभाळत आहेत.आजही वर्गखोल्यामध्ये पाठ्यपुस्तक हेच शैक्षणिक साधन प्रभावीपणे वापरण्यास शिक्षक उत्सुक दिसतात.मात्र या पाठ्यपुस्तकांना तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याचे आव्हान बालभारती समोर आहे.शिक्षण मंत्र्यांनी देखील बालभारती ला ‘e-बालभारती’ चे स्वरूप देण्याचा मनोदय सदैव बोलून दाखवला आहे.तंत्रज्ञान वापराने अंकीय दरी ( digital divide ) कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान अधिक सुलभरीत्या ग्रामीण भागात पोहचवणे आवश्यक ठरते. ‘e-बालभारती’ च्या प्रयोगातून ही दरी कमी करता येणे शक्य आहे.कारण पाठ्यपुस्तके प्रत्येक मुलापर्यंत सहजरीत्या पोहचतात.पाठ्यपुस्तके तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम केली तर तंत्रज्ञान वापरास उत्सुक नागरिक प्राथमिक स्तरातुनच तयार होतील.मोबाईल च्या माध्यमातून पाठ्यपुस्तकांना ‘e-बालभारती’ चे स्वरूप देत डिजिटल नागरिक घडवणाऱ्या अशाच  एका  यशस्वी प्रयोगाबद्दल आज जाणून घेवूयात.सोलापूर च्या जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी हा प्रयोग जून 2015 पासून राबवला आहे.QR चा पाठ्यपुस्तकात वापर करणारा हा प्रयोग.QR कोड म्हणजे Quick Responce code. मुख्यतः व्यापारी क्षेत्रात याचा वापर केला जातो.या कोड मध्ये सांकेतिक रुपात साठवलेली माहिती मोबाईल द्वारे काही क्षणात प्राप्त करता येते.मात्र या कोडचा शिक्षण क्षेत्रात  कल्पकपणे वापर रणजीतने केला.पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पाठासाठी  त्यांनी हे QR कोड तयार केले.या कोड मध्ये संबंधित पानांवरील आशय अंकीय स्वरुपात ( Digital content ) साठवला . या कोड मध्ये साधारणपणे  खालील घटक सामाविष्ट आहेत.

·         अभ्यासविषयक सूचनाचा संच,
·         बालकाने करावयाच्या कृती संच
·         कविता असेल तर MP३ format
·         गोष्टी साठी व्हिडीओ
·         online प्रश्नपत्रिका
·         हेप्ल्लाईन नंबर
·         आपल्या मुलाचा प्रतिसाद कॅम्मेरा मध्ये रेकॉर्ड करण्याची सुविधा
·          online feedback
बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील सर्व कविता त्यांनी ऑडीओ रुपात तयार करून घेतल्या.पाठांशी संबंधित विडीओ स्वतः तयार केले.पालक व शिक्षक यांना मार्गदर्शक असे विडीओ ‘QUEST’ सारख्या संस्थांकडून घेतले.तसेच मुलांचे मूल्यमापन करण्यासाठी online प्रश्नपत्रिका देखील तयार केल्या.आपल्या मुलाचा अभ्यास कसा घ्यावा ? मुल समजून कसे घ्यावे ? याविषयीच्या मागर्दर्शक सूचना देखील  या QR कोड मध्ये आहेत.हा सर्व अंकीय आशय ( Digital content )  त्यांनी QR कोड मध्ये रुपांतरीत केला. हे सर्व कोड त्यांनी पुस्तकात संबंधित पानांवर चिटकवले.मोबाईल मधील NEO Reader या app च्या सहाय्याने हा QR  कोड स्कॅन केला कि त्या पानावरील कविता ऑडीओ रुपात ऐकायला मिळते, पाठाचा विडीओ  पाहता येतो. विडीओ पाहून झाला कि लगेच online प्रश्नपत्रिका मोबाईल वर झळकू लागते.ही प्रश्नपत्रिका सोडवली असता त्याचा निकाल मुलाच्या इ-मेल वर तात्काळ प्राप्त होतो.प्रत्येक मुलाला त्याच्या गतीने ,कधीही ,कुठेही शिकण्याची संधी यामुळे मिळत आहे.एखादा घटक मुलाला समजला नाही तर तो पुन्हा कोड स्कॅन करून शिकू शकतो.या कोड मध्ये त्यांनी online feedback  देण्याची देखील सोय केली असून काही अडचण आली तर हेल्पलाईन देखील सुरु ठेवली आहे.पाठ्यपुस्तकातील आशय जिवंत करण्याची किमया या तंत्राने साध्य झाली असून आज महाराष्ट्रातील 7427  जि.प.शाळांमधील जवळपास 1,50,000 मुले ही QR कोडेड बुक्स वापरत आहेत.मोबाईल चा शैक्षणिक वापर करण्यास प्रोत्साहन देणारा हा प्रकल्प तंत्रस्नेही नागरिक घडवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.या तंत्रज्ञानाची व्यापकता वाढण्याचे कारण म्हणजे त्याची सुलभता.मोबाईल त्या QR कोड वर धरला कि, त्या कोड मधील आशय आपोआप मोबाईल वर झळकू लागतो.इतके साधे हे तंत्रज्ञान. या सुलभतेमुळे ग्रामीण भागातील अशिक्षित समजला  जाणारा पालक देखील आता तंत्रस्नेही होत आहे.पाठ्यपुस्तकातील भूस्क्खलन,ग्रहण,अन्नपचन सारख्या अमूर्त संकल्पना मुलांना समजावून सांगणे कठीण जाते असा शिक्षकांचा अनुभव आहे.मात्र या तंत्रामुळे ही समस्या दूर झाली आहे. पाठ्यांशाशी संबंधित विडीओ  शोधणे , ते डाउनलोड करणे या कंटाळवाण्या प्रक्रियेला देखील यामुळे सक्षम पर्याय मिळाला आहे.
QR कोडेड बुक्स च्या यशस्वी प्रयोगानंतर त्यांनी तयार केली आहेत Virtual books.(आभासी पुस्तके)
                            बालभारती च्या पुस्तकांवर मोबाईल धरला असता त्या पानावरील आशय व्हर्च्युअल रियालिटी तंत्राने मूर्त स्वरुपात अनुभवणे , पुस्तकातील अनेक अमूर्त संकल्पना 3 D विडीओ रुपात व कविता animation च्या माध्यमातून    मोबाईल वर अनुभवता येणे शक्य झाले आहे.हे सारे शक्य झाले आहे ते आभासी पुस्तकांमुळे (Virtual Text Books ). स्मार्ट फोन मधील AR या app च्या मदतीने ही virtual reality अनुभवता येणार आहे.यामुळे आता मोबाईल चा शैक्षणिक वापर करून अनेक कठीण संबोध अगदी सहज स्पष्ट करता येतील .
 आज आपण 3D चित्रपट पाहतो , 3 D चित्रे पाहतो.मात्र रणजीत ने पुस्तकेच 3 D  स्वरुपात बनवली आहेत.Augmented Reality  या तंत्राचा वापर करून ही आभासी पुस्तके बनवण्यात आली असून यात विज्ञान व भूगोल विषयातील कठीण संकल्पना 3 D  रुपात स्पष्ट करण्यात आल्या आहेत.आपल्या जवळ असणारा हा स्मार्ट फोनच आपल्याला या आभासी पुस्तकांचा अनुभव देतो.
QR कोडेड बुक्स काय किंवा Virtual बुक्स  काय , ही भविष्याचा वेध घेणारी पुस्तके आहेत. इ-लर्निंग , डिजिटल लर्निंग च्या नावाखाली लाखो रुपये खर्ची पडत असताना मोबाईल लर्निंग चा हा प्रयोग नक्कीच दखलपात्र ठरतो.
आज अनेक शाळांमध्ये संगणक उपलब्ध नाहीत.जिथे आहेत तिथे विजेची समस्या देखील आहेच.संगणक प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता देखील आहेच.मात्र यावर मात करून केवळ मोबाईल च्या आधारे तंत्रस्नेही नागरिक घडवणाच्या या प्रयोगाची दखल microsoft घेतली असून रणजीत डिसले यांना  “ गोल्डन इंनोव्हेशन ” पुरस्काराने सन्मानित केले आहे.अशा यशस्वी प्रयोगांचे सार्वत्रीकरण करण्याची जबाबदारी सरकारवर आहे.बालभारतीने अशा पुस्तकांची निर्मिती केली तर हे तंत्रज्ञान तळागाळातील नागरिकांपर्यंत सुलभरीत्या पोहचेल यात शंका नाही. 

हे पान AR app मधून स्कॅन केले असता यातील आभासी आशय मोबाईलमध्ये दिसून येईल.

वरील QR कोड NEO Reader या app च्या साह्याने स्कॅन केले असता पुस्तकातील आशय digital स्वरुपात मोबाईल वर पाहता येतो.
हे सर्व कोड मिळवण्यासाठी ९४०४६६५०९६ या क्रमांकावर तुमचा इ मेल sms करा .

रणजितसिंह डिसले


Saturday, 5 December 2015

कुबेरी संपादकांना “ माझ ” पत्र ..... रणजितसिंह ङिसले

कुबेरी संपादकांना “ माझ ” पत्र ..... रणजितसिंह ङिसले


प्रती
   गिरीश कुबेर (लोकसत्ता)
 व राजीव खांडेकर( ABP माझा )


       विषय : माध्यमांच्या घटनाविरोधी  वैचारिक असहिष्णुतेबाबत

      महोदय ,
                        सप्रेम नमस्कार .

             आपण दोघेही प्रसार माध्यम क्षेत्रातील बिनीचे मराठी शिलेदार आहात याचा मला सदैव अभिमान असतो.समाजातील प्रत्येक घटनेमागे पाहण्याची दृष्टी आपण देत असता. मात्र मागील काही महिन्यांपासून मी निरीक्षण करतो आहे, आपले विचार स्वातंत्र्य  काहीसे स्वैरपणे उपभोगत आहात असे वाटते.मला एक भारतीय नागरिक म्हणून घटनेने जितके मुलभूत हक्क दिलेत तितकेच ते तुम्हाला देखील दिले गेले असावेत अस मला वाटत.एक माध्यम प्रतिनिधी म्हणून तुम्हाला घटनेने काही जादा अधिकार दिले असतील तर मला मात्र मला अल्पज्ञानी समजावे.मात्र लोकसत्तेच्या अग्रलेखातून विशिष्ट समाजघटकाला  “ दळभद्री ”,  “ बिनडोक ”  असे विशेषण लावत शाब्दिक आसूड ओढणे हे कितपत संयुक्तिक आहे?याच आठवड्यातील २ घटनांवर तर आपले विचार स्वातंत्र्य  अधिकच स्वैर झाल्याचे जाणवते.पहिली घटना होती शनी शिंगणापूर ची व दुसरी होती मुंबई च्या एका चित्रपट गृहातील.या घटनांवर आपण पुढील शीर्षकाने अग्रलेख लिहिलेत.

·       “ भेदाभेद भ्रम अमंगळ” ,
·       “ बिनडोकांची राष्ट्रभक्ती ” ,
·        “ परंपरांच संमोहन ”.
                        (हे अग्रलेख वाचकांनी जरूर वाचावेत ).

शनी शिंगणापूर च्या प्रसंगाकडे तटस्थ पणे पाहण्याची परिपक्व मानसिकता आपल्याकडून अपेक्षित होती.कारण तिथे “ ती ” महिला व गावकरी यांनी केलेली कृती ही घटनेच्या चौकटीत राहूनच केली होती. त्या महिलेने चौथऱ्यावर जात तेल वाहणे ही कृती तिला घटनेने  दिलेल्या संचार स्वातंत्र्याशी सुसंगतच आहे.त्याच वेळी गावकऱ्यानी दुग्धाभिषेक घालण्याची कृती घटनेतील कलम 25 चे पालन करणारी होती.इथे कुठेही घटनेची पायमल्ली झाली नाही ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ असताना तुम्ही प्रसार माध्यमांमधून समाजमनात या घटनेविषयी द्वेष भाव निर्माण होईल अशी वार्तांकन केल्याचे वारंवार दिसून आले.अगदी काही क्षणात तुम्ही गावकऱ्यांना प्रतिगामी ठरवले. मुळात शनी शिंगणापूर च्या ग्रामस्थांनी चौथऱ्यावर जाण्यास केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांना देखील मनाई केली आहे हे वास्तव तुम्हीदेखील जाणून आहात..मूर्ती चे पावित्र्य कायम राहावे म्हणून नव्हे तर त्या मूर्तीचे संवर्धन व्हावे म्हणून हा निर्णय घेतला आहे अस त्या विश्वस्तांच म्हणणे देखील तुम्ही मान्य करायला तयार नाहीत.मात्र त्या महिलेच्या कृती मुळे मंदिर अपवित्र झाले म्हणून गावकऱ्यानी दुग्धाभिषेक केला हा तुमचा तर्क तुम्ही लोकांच्या गळी उतरवण्याचे काम करत राहिलात.आणि या तुमच्या कृतीचे समर्थन करणारे पुरोगामी व याच्या विरोधी मत असणारे प्रतिगामी अशी वर्गवारी देखील तुम्ही करून टाकली.भारतीय राज्य घटनेने नागरिकांना मुलभूत हक्क हे अनिर्बंध वापरासाठी दिलेले नाहीत. मुलभूत हक्कांच्या वापरावर भारताची / राज्याची एकात्मता,सुरक्षितता,सार्वजनिक सुव्यवस्था , सभ्यता किंवा नितीमत्ता या कारणास्तव बंदी घालता येते, हे तुम्ही देखील जाणून आहात.मग जर संचार स्वातंत्र्यावर सार्वजनिक सुव्यवस्था कायम राखणे याकारणास्तव शनी शिंगणापूर च्या चौथऱ्यावर प्रवेश करण्यापासून काही निर्बंध लादले गेले असतील तर ही बाब घटनेतील तरतुदीशी सुसंगत नाही का ? विश्वस्तांचे प्रतिनिधी ABP माझा च्या विशेष चर्चेत हीच बाब अधोरेखित करत होते ; मात्र बडे नामक ABP माझा चा सूत्रसंचालक गावकऱ्यांच्या  कृतीला महिलेचा विटाळ झाला म्हणून वारंवार संबोधित करत होता , हे मात्र नीतिमत्तेचा व सभ्यतेचा भंग करणारे होते. त्या सूत्रसंचालकाच्या त्या सातत्यपूर्ण वक्तव्यामुळे महिला शक्ती कार्यकर्त्या अधिकच आक्रमक झाल्या नसत्या तर नवलच.TRP वाढवण्याच्या नादात आपण समाजात कोणता  संदेश देत आहोत याचे भान बडे ला राहिले नाही.
जी चूक बडे ने केली तीच चूक अभिजित कारंडे हा ABP माझा चा सूत्रसंचालक ४ डिसेंबर च्या चर्चेत करताना दिसला.एखाद्या घटनेवर एक महिला म्हणून पंकजा मुंडे यांनी दिलेली प्रतिक्रिया कशी चुकीची आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याने आटोकाट प्रयत्न केले.मात्र इतरांच्या मताचा आदर करावा याचे सौजन्य तो दाखवू शकला नाही.एक निरीक्षण असे कि या २ माध्यमांच्या विरोधी भूमिका जे घेतात त्यांना ही २ माध्यमे प्रतिगामी ठरवतात.मुळात माध्यमाना असे अधिकार आहेत का ? हा प्रश्न उपस्थित होतो.असे समाजात चुकीचे संदेश देणारे प्रसारण आपण नक्कीच टाळू शकतो.जरी एखादी कृती घटनेतील तरतुदींशी सुसंगत असली मात्र ती या २ माध्यमांच्या विचारधारेशी विसंगत असेल तर ही माध्यमे लगेच शाब्दिक आसूड ओडल्याशिवाय राहत नाहीत असे सकृतदर्शनी वाटते.कारण पंकजा मुंडे यांच्या विधानाला वा व्यक्त केलेल्या मताला लोकसत्तेने तर्कटांचे शेलके विशेषण जोडले आणि आज ५ डिसेंबर ला लगेच अग्रलेख देखील लिहून टाकला.मग प्रश्न असा निर्माण होतो कि या देशात घटना श्रेष्ठ कि ही २ माध्यमे ? कारण घटनेचे पालन करत केलेल्या कृतीना हे त्यांच्या विचारधारेच्या विरुद्ध मानतात.लोकसत्तेची ही कुबेरी वृत्ती “ बिनडोकांची राष्ट्रभक्ती ” या अग्रलेखातूनदेखील  व्यक्त झाली आहे.Prevention of insults to national honors act चा आधार घेत अप्रत्यक्षपणे वाजवल्या जाणाऱ्यां राष्ट्रगीताचा मान राखणे बंधनकारक नाही असा तर्क त्यातून व्यक्त झाला आहे.या विधानाचे किती दूरगामी परिणाम होतील याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. एक भारतीय नागरिक मुलभूत  कर्तव्य पार पाडत नसेल तर त्यावर घटनेत उल्लेखित कारवाई होईल.आज मी माझ्या शाळेत वीज नसताना मोबाईल वर राष्ट्रगीत ऐकवून परिपाठ घेतो.राष्ट्रगीताचा  मान राखावा या कर्तव्याची जाणीव भावी नागरिकांना मी करून देत असतो.मात्र राष्ट्रीय प्रतीकांचा मान राखणे हे  ती प्रतीके ज्या माध्यमातून प्रसारित होतात त्यावर अवलंबून आहे  अशी घटनाविरोधी भूमिका गिरीश जि आपण घेत आहात ती राष्ट्रीय एकात्मतेस नक्कीच अहितकारक आहे असे तुम्हाला वाटत  नाही का ? .लोकसत्तेची  ही भूमिका घटनेत उल्लेखित मुलभूत कर्तव्याशी मात्र पूर्णतः विसंगत आहे.आपली राष्ट्रीय प्रतीके मग ती कोणत्याही माध्यमात असोत एक नागरिक म्हणून आपण त्यांचा मान राखला पाहिजे अस एक सामान्य नागरिक म्हणून माझ मत आहे.आपला राष्ट्रध्वज जर एखाध्या वृत्तपत्रात छापून आला असेल तर तो पेपर सांभाळून ठेवण्याचे संस्कार आम्ही भावी नागरिकांवर करत असतो.मात्र राष्ट्ध्वज फडकत असेल तरच त्याचा मान  राखला जावा बाकी इतर ठिकाणी नाही अशी भूमिका घटनाविरोधी नाही का ? मात्र राष्ट्रप्रेमाच्या सामजिक उर्जेने प्रेरित समाज घटकास  “ बिनडोक “ असे संबोधणे कितपत सभ्य आहे ? अशा घटना विरोधी भूमिकेमुळे जर तुम्ही पुरोगामी ठरत असाल तर मग आम्हा भारतीय नागरिकांचा दोष तो काय ? एक माध्यम प्रतिनिधी म्हणून अशी घटना विरोधी भूमिका तुम्ही कशी काय घेवू शकता? अशी घटना विरोधी भूमिका घेण्याचे विशेषाधिकार तुम्हाला दिले गेले असतील तर आम्हाला देखील ते सांगावे.आपण दोघेही आता हळूहळू विरोधी पक्षाच्या भूमिकेत जात असल्याचे जाणवत आहे. भारतात मिडीया हाच सर्वात प्रभावी व कायमस्वरूपी विरोधी पक्ष राहिला आहे . शिक्षण धोरण मसुद्यावर असेच आपण चुकीचे चित्र निर्माण करणारे वार्तांकन केले होते याचे स्मरण करून द्यावे वाटते.मात्र सामजिक घटनांकडे वार्तांकनाच्या नजरेतून कसे पाहावे हे  पँरीस हल्ल्यानंतर च्या स्थानिक वार्तांकनाहून नक्कीच बोधप्रत आहे.मात्र आजही आपण असे चुकीचे संदेश समाजात बेधडक पसरवत असतो.
लहान तोंडी मोठा घास वाटेल ही , पण व्यक्त होणे महत्वाचे वाटले म्हणून लिहिले.लोकसत्ता काय किंवा ABP माझा काय ही माध्यमे जेंव्हा घटनाविरोधी भूमिका घेतात तेंव्हा देशाचे सर्वोच्च प्रमुख म्हणून राष्ट्रपतींनी वा न्यायालयांनी  काही हस्तक्षेप करावा का? स्वयांनिर्धारित शासन प्रणाली माध्यमांनी स्वीकारली आहे त्याचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे का ? असे प्रश्न मनात आहेत . आपले विचार नक्की मांडा
                                                 तूर्तास थांबतो .
                                                                पुन्हा भेटूया
रणजितसिंह ङिसले,बार्शी
                                                                          ९४०४६६५०९६

 onlyranjitsinh@gmail.com