भारतातील महिला ऑलींपिकपटू राज्य सरकारने जाहीर केलेल्या बक्षिसाची रक्कम न मिळाल्यामुळे नाराज असताना अमेरिकेतील ऑलींपिकपटू सध्या काय
करतात ? हा प्रश्न सहजच मनात डोकावला. अन शोध सुरु झाला अमेरिकेतील‘ती’चा. Classroom
Champions ने याकामी आम्हाला सहकार्य केले. अन मेरील डेविस ही खेळाडू आमच्या शाळेत
अवतरली.मेरील डेविस या ऑलींपिक पदकविजेत्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ,
आमच्या जि.प.कदमवस्ती शाळेत आमंत्रित करण्यात आले होते.मेरील ही अमेरिकेची २७
वर्षीय Ice Ball Skitter असून दोन वेळा ऑलींपिक पदक मिळवले आहे.अर्थात अमेरीकेतील
ही खेळाडू अन आमच्या शाळेतील मुले यांचा संवाद रंगला तो ‘skype’ च्या माध्यमातून.

मेरीलला आपला भारत देश
खूप आवडतो.भारतीय पदार्थ तिच्या घरी बनवले जातात.पनीर टिक्का व आमरस हे तिचे आवडते
भारतीय पदार्थ.सकाळची वेळ साधून मी तिला माझ्या डब्ब्यातील शिरा खाण्याचा आग्रह
केला. तिला तो कॅमेऱ्यासमोर नेवून दाखवलादेखील.मात्र तिला तो खाता आलाच नाही.(
अजूनतरी असे तंत्रज्ञान आमच्या शाळेत उपलब्ध नाहीये, नाहीतर तिला शिरा खाता आला असता.)
भारतीय संगीत तिला आवडते. बॉलीवूडच्या चित्रपटातील संगीत खूप उत्साहवर्धक असल्याचे
तिचे म्हणणे आहे. ‘देवदास’ हा तिचा आवडीचा चित्रपट आहे. तिला मिळालेले पहिले ऑलींपिक
पदक तिने बॉलीवूड गाण्यावर स्केटिंगकरूनच मिळवले आहे. हे सांगत असताना तिने तिच्या
‘त्या’ कामगिरीचा व्हिडीओ share केला.पुढील लिंकला क्लिक करून तुम्हीदेखील तो पाहू
शकता https://www.youtube.com/watch?v=XUzchzkitdQ. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारी ही खेळाडू इटालियन भाषादेखील अस्खलितपणे
बोलते. इटालियन भाषेतील दोन वाक्ये तिने उच्चारली पण आम्हाला ती काहीच न
समजल्यामुळे परत त्याचे भाषांतर करून सांगितले. तिचे हे भाषाविषयक प्रेम पाहून
मलाही रहावले नाही अन मी देखील हिंदी अन मराठीतील दोन-दोन वाक्ये तिच्याकडून वदवून घेतली. ‘मी चांगली आहे’
हे उच्चारताना तिला स्वतःलाच खूप आनंद झाला. मुलांनी मराठीतून विचारलेल्या
प्रश्नाला तिनेदेखील मराठीतूनच उत्तर दिले अन आनंदाच्या भरात स्वतःच टाळ्या
वाजवल्या.अशी ही जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी खेळाडू.
ऑलींपिकच्या तयारीविषयी
ती भरभरून बोलली.घराजवळच असणारे तळे हिवाळ्यात गोठून जायचे अन तयार झालेल्या
बर्फावर ही चिमुकली मेरील स्केटिंग करत असे.त्या वयातच तिला स्केटिंग आवडू लागले.क्रेग
सोबत ती मागील १७ वर्ष्यांपासून सराव करत आहे. रोज सकाळी ७ ते १ पर्यंत
सराव,दुपारी कॉलेज अन सायंकाळी जीम असा तिचा दिनक्रम असतो. ती २०१८ सालच्या ऑलींपिक
मधे सहभागी होणार नाहीये,मात्र तरीही तिचा हा दिनक्रम चुकलेला नाही. शिक्षण पूर्ण
करण्याच्या हेतूने ती २०१८ च्या ऑलींपिक मध्ये सहभागी होणार नाहीये.तिने तिच्या
डायरी मधील एक पान आमच्याशी share केले,ज्यात तिने तिचे गोल सेटिंग कशाप्रकारे
केले अन ते साध्य करताना आलेल्या अडचणी याबद्दल लिहिले आहे. मुलांना तिने एक
महत्वाची बाब सांगितली , ती म्हणजे कोणतेही ध्येय गाठताना छोटी छोटी उद्दिष्टे
ठरवा, ती टप्प्याटप्प्याने गाठत पुढे चला.सातत्यपूर्ण प्रयत्नांनी ध्येय गाठता
येते हा तिचा स्वानुभव आहे.
संवादाच्या
शेवटच्या टप्प्यात आमच्या मुलांनी तिला
पर्वतासन,ताडासन व पश्चिमोत्तानासन ही
आसने करून दाखवली. चिमुकल्या मुलांची ही लवचिकता पाहून ती स्तब्ध झाली.मुलाच्या या
कृतींमधील सहजेबाबत तिने अधिक जाणून
घेतले. तिला आमचा हा योगा क्लास खूप आवडला.भारतातून तिला आंबे पाठवण्याचे निश्चित
करून आमच्या या संवादाचा समारोप झाला. आजवर २३ देशांचा आभासी दौरा केलेली आमची
चिमुकली टीम वाट पाहतेय पुढच्या देशाची. लवकरच भेटूयात . तूर्तास थांबतो.
रणजितसिंह डिसले
onlyranjitsinh@gmail.com
Comments
Post a Comment