Skip to main content

परितेवाडीतले 'स्मार्ट' सर… रणजितसिंह डिसले






                                       जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीची शाळा, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील परितेवाडीची. तालुक्यालाच जिथं शहर म्हणता येणार नाही, अशी स्थिती तिथे गावची काय कथा? शाळेची एक वर्ग खोली गोठा म्हणून वापरली जात होती, तिथे वर्गात इनमिन ५-६ मुलं असायची. बाकीची आपापल्या शेतात रमलेली.  पण रणजितसिंह डिसले या स्मार्ट शिक्षकाने या शाळेचं नाव जगाच्या कानाकोप-यात पोहोचवले आहे. फळा आणि खडूत अडकलेलं परंपरातगत शिक्षण त्यांनी बदलून टाकलं. ‘क्युआर कोड’ आणि ‘व्हर्च्युअल फिल्ड ट्रीप’च्या स्मार्ट उपक्रमातून त्यांनी शिक्षण पद्धतीला डिजिटल रूपडं दिलं आणि शाळाबाह्य मुलांच्या जीवनात एक नवी पहाट उगवली. त्यांच्या या उपक्रमाची दखल घेऊन जगप्रसिध्द मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्यांना ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटेड एज्युकेशन एक्सपर्ट’ या किताबाने गौरविलं आहे. हा पुरस्कार पटकाविण्याची त्यांची ही पहिली दुसरी वेळ नव्हे, तर चक्क चौथी वेळ आहे. 
त्यांचा पहिला प्रयोग होता तो ‘क्यु आर कोड’चा. मुलं शाळेत येत नव्हती म्हणून त्यांनी शाळाच मुलांच्या घरी नेली तेही QR कोडच्या माध्यमातून.  आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या पुस्तकातील प्रत्येक धड्यावर त्यांनी क्यु आर कोड चिकटवला. जगात पहिल्यांदाच असा अभिनव शैक्षणिक प्रयोग परितेवाडीच्या शाळेत राबवत त्यांनी त्या पुस्तकातील धड्यांना डिजिटल केले. या क्युआर कोड समोर विद्यार्थ्याने मोबाईल धरला की धड्याची व्हिडीओ माहिती, कवितेची आॅडीओ क्लिप बोलू लागली. अभ्यासाच्या पद्धतीतील या बदलामुळे मुलांच्या समजण्या-उमजण्याची क्षमता कैक पटीने वाढली. शिवाय मुलांना मोबाईल गेम्ससाठी नव्हे तर अभ्यासासाठी वापरायचा हे नवीन तंत्रज्ञान भावलं. परितेवाडी जि. प. शाळेचा हा प्रयोग सुरुवातीला माढा तालुक्यातील ३०५ शाळांमध्ये राबविला. त्यानंतर या प्रयोगाची दखल बालभारतीने घेतली आणि २०१६ पासून राज्यातल्या सर्व पुस्तकांतील सर्व धड्यांना क्यु आर कोडने डिजिटल करुन टाकलं. आज महाराष्ट्रातील सर्वच इयत्तांची पुस्तकं क्यु आर कोड स्वरुपात छापली जातात, याचं श्रेय डिसले गुरुजींचंच. इतकेच नव्हे तर आता २०१९  वर्षीपासून एनसीईआरटी हा प्रयोग संपूर्ण देशातील पुस्तकात करते आहे. परितेवाडीसारख्या गावातील शिक्षकाचा प्रयोग देशपातळीवरील अत्युच्य संस्था स्वीकारते कारते आणि राबविते ही गोष्ट निश्चितच साधी नाही. 
सतत नाविन्याचा ध्यास असलेल्या डिसले सरांनी आता नवा प्रयोग हाती घेतला. हा प्रयोग होता ‘व्हर्चुअल फिल्ड ट्रिप’चा. ही कल्पना अत्यंत अफलातूनच. समजा इतिहासाचे पुस्तक आहे. चौथीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. हा इतिहास शब्दरुपाने पुस्तकात दिला आहे. पण फक्त पुस्तक वाचून छत्रपती शिवरायांचे कर्तृत्त्व मुलांच्या नजरेत कसे भरेल? मग त्यांनी त्या गड, किल्यावरील स्थानिक नागरिकांना संपर्क करून स्काइपच्या माध्यमातून तो इतिहास जिवंत केला. सरांनी शिकविले ते आणि त्यापेक्षा अधिक माहिती विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लाईव्ह ऐकली. अनंत प्रश्न विचारले आणि आपले ज्ञान वाढवून घेतले. हे फक्त शिवनेरी पुरते मर्यादीत राहीले नाही. पेग्वीन पक्षाची माहिती अभ्यासताना दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथील सॅनकॉबचा गाईड, आयफेल टॉवरची माहिती सांगायला पॅरीसमधला गाईड, समुद्राच्या तळाचं जग पाहताना सर्बियाच्या अंडरवॉटर लॅबचा गाईड, अमेरिकेतील फक्त कासवांच्या हॉस्पिटलचे डॉक्टर अशा जगभरातील ८८ देशांच्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी परितेवाडीच्या मुलांशी लाईव्ह संवाद साधलाय. मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन शंका समाधान केलेय. अशा पध्दतीने ज्ञानदान करणारा भारत आठवा देश आणि भारतात परितेवाडी ही पहिली शाळा होती. प्रत्येक शिक्षक प्रत्येक विषयात परिपूर्ण नसतो, पण विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे सर्वोत्तम शिक्षण मिळाले पाहिजे, म्हणून आम्ही स्काइपच्या माध्यमातून राज्यातील, देशातील आणि जगभरातील इतर शाळांच्या शिक्षकांची थेट भेट घेण्याचा हा उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या education.microsoft.com या संकेतस्थळाचा मला फायदा झाला.” डिसले सांगतात.विद्यार्थ्यांनी या व्हर्च्युअल फील्ड ट्रिपच्या माध्यमातून गणित उत्तम शिकवणारे नवनाथ शिंदे सर, लेखक राजीव तांबे, यांच्याशी गप्पा साधल्या. जगातील सात आश्चर्यांपैकी काही आश्चर्यांचा आनंद परितेवाडीत बसून घेतला. याच साधनांचा वापर करुन सोलापूरच्या विज्ञान केंद्रात बसून त्यांनी आपल्या शाळेसह ३०० शाळांच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचे शेकडो प्रयोग दाखविले आहेत. याच प्रयोगाची दखल घेऊन मायक्रोसॉफ्टने त्यांना चौथ्यांदा ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटेड एज्युकेशन एक्सपर्ट’ हा पुरस्कार घोषित केला आहे. 
मुलांना ज्ञानदान करताना हे वेगवेगळे प्रयोग करुन त्यांनी वेगळेपण दाखवून दिलेच, शिवाय पालकांनाही एका उपक्रमातून सामावून घेतले. त्या उपक्रमाचे नाव आहे ‘अलार्म आॅफ टीव्ही’ याकरिता शाळेत एक भोंगा बसविला आहे. हा अलार्म रोज रात्री सात वाजता वाजवला जातो. हा अलार्म वाजला की गावातील घरा-घरातील टीव्ही बंद होतात. कारण पालकांना या अलार्ममुळे ही वेळ मुलांच्या होमवर्कची आहे हे कळते. पालकसभा घेऊन आमचा अभ्यास तुम्ही घरी घ्यायचा हे डिसले सरांनी पालकांवर जबाबदारीने सोपवून दिले. शिवाय अभ्यास कसा घ्यायचा यासाठी पालकांच्या मोबाईलची मदत घेतली. प्रत्येक मुलाच्या पालकाचा मोबाईल नंबर त्यांनी रजिस्टर करुन घेतला असून दुपारीच त्या मोबाईलवर मुलांचा कोणत्या विषयाचा काय अभ्यास आहे याचा संदेश जातो. उदा. होमवर्कमध्ये कविता असेल तर मुलगा घरात कविता वाचेल किंवा म्हणेल. पालकांनी ऐकायचे, चुका सांगायच्या. शुध्दलेखन असेल तर पालकांनी अक्षरे वळणदार येत आहेत का, चुका होत आहेत का हे पहायचे. सरांच्या अशा उपक्रमांमुळे परितेवाडीत बदल घडू लागला आहे.आज या  गावात एकही मुलगा शाळाबाह्य नाही, हे विशेष.
वर्गखोल्यामधील शिक्षण खऱ्या अर्थाने मुक्त करीत त्यांनी २१ व्या शतकातील कौशल्ये विकसनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु केले.  त्यांना त्यांच्या गावात झाडे लावून जगवण्याचा प्रयोग करायचा होता. परंतु त्यांना त्यांच्या अखत्यारीतील गाव माळढोक अभयारण्य परिसरात असल्यामुळे तेथील नियमांमुळे तेथे झाडे लावणे शक्य झाले नाही. तेव्हा त्यांनी त्यांच्या गावात झाडे आहेत तरी किती, ते मोजण्याचे ठरवले. तसेच, वन्यक्षेत्र किती आहे तेही जाणून घेण्याचे ठरवले. त्यांनी त्यात विद्यार्थ्याना गुंतवले. त्यांनी झाडाचे क्षेत्रफळ काढण्याचे तंत्र विद्यार्थ्याना शिकवले. दोराचे एक टोक झाडाच्या बुंध्यापर्यंत व दुसरे टोक त्या झाडाची सावली जेथपर्यंत जाते तेथपर्यंत ठेवायचे. त्याला झाडाची त्रिज्या म्हणतात. त्या त्रिज्येच्या आधारे वर्तुळ काढायचे. त्यांनी तशा प्रकारे प्रत्येक झाडाचे क्षेत्रफळ काढले. त्यांना ती कल्पना आपोआप सुचली नव्हती. ते सांगतात, की एकातून एक नव नव्या कल्पना सुचत गेल्या. एकट्याने ते क्षेत्र वाढवणे गावात शक्य होणार नव्हते. त्यांनी त्या गावातील लोकांची मीटिंग बोलावली. त्या गावातील झाडांची मोजणी केली. त्यात दोन-अडीच महिने गेले. तेव्हा वनक्षेत्र एकवीस टक्के आहे हे कळले. त्यांना त्यावरून ती योजना मोठ्या प्रमाणावर करावी असे वाटले. झाडे वाचवण्याची लोकचळवळ उभारावी. त्यासाठी पूर्ण गावाचा सर्व्हे केला आणि गावचे एन्व्हायर्नमेंटल रिपोर्ट कार्ड तयार केले. प्रत्येक घरात गाड्या किती आहेत, चूल-गॅस किती घरांत आहे. मग दुचाकीतून निघणारा धूर व चारचाकीतून निघणारा धूर किती असेल हे काढण्यात आले. त्यात असाही प्रश्न होता, की तुम्ही (परिवाराने) झाडे किती लावली? आणि किती तोडली? त्यातून असे दिसून आले, की झाडे तोडण्याचे प्रमाण अधिक आहे. प्रत्येक झाड तोडण्याचे कारण क्षुल्लक होते. कोणी पैशांसाठी तर कोणी लग्नाच्या स्वयंपाकासाठी जळण म्हणून झाडे तोडली होती! शेताच्या बांधावर झाड असल्यामुळे त्या क्षेत्रात काही करता येत नाही म्हणून ते तोडण्यात आले होते. काही झाडांसंबंधी भांडणे होती. ज्या पालकांनी झाडे तोडली होती त्यांच्या मुलांना ती झाडे दत्तक देण्यात आली. विद्यार्थ्यांकडून पालकांना अशा तऱ्हेने झाडे तोडण्यापासून परावृत्त करण्यात आले. त्यांनी एक झाड तोडल्यावर काय परिणाम होतो ते प्रेझेन्टेशन करून सांगितले. त्यानंतर सरांनी वन अधिकाऱ्यांची मदत घेऊन प्रत्येक झाडाचे वयोमान काढले. त्यानुसार ए गटात चार ते पाच वर्षे, बी गटात पाच ते सात वर्षे, सी गटात सात ते पंधरा वर्षे आणि डी गटात पंधरा वर्षापुढील झाडे अशी वर्गवारी केली. गेले. गावकऱ्यांचा प्रश्न असा होता, की कोणते झाड कोणत्या गटात आहे हे कळणार कसे? म्हणून झाडांना तसे टॅग लावले. त्यांनी सर्व झाडांची पर्यावरणीय महत्त्व व त्यांच्या वयोमनानुसार विविध गटांत वर्गवारी केली. डी गटातील झाडे तोडण्यावर पूर्णतः बंदी असून इतर गटांतील प्रत्येक झाड तोडल्यास नवी पाच झाडे लावणे व ती जतन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरीदेखील चिंचेची चार-पाच झाडे तोडली गेली. ती पन्नास हजार रुपयांसाठी तोडण्यात आली होती. त्यावेळी ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण निसर्गात वाढल्यास कशी परिस्थिती उद्भवू शकेल ते वेगवेगळ्या उदाहरणांसह गावकऱ्यांना समजावले गेले. डी गटातील झाडांवर विशेष सेन्सर लावण्यात आले असून, ती झाडे तोडण्याचा प्रयत्न केल्यास मुलांच्या मोबाईलवर झाडाच्या जीपीएस लोकेशनसह मेसेज जातो. त्या अभिनव तंत्रज्ञानाच्या मदतीने पाच वर्षांत गावातील वनाच्छादित क्षेत्रात वाढ झाली आहे. तो प्रयोग 2013 ते 2018 या कालावधीत राबवण्यात आला. वृक्ष संवर्धनाचा हा परितेवाडी   पॅटर्न जपान, इटाली आणि मलेशिया या देशांतील शाळांनीही अवलंबला आहे. डिसलेसरांच्या या प्रयोगाची दखल घेतली गेली ती आंतरराष्ट्रीय ‘नॅशनल जिऑग्राफिक इनोव्हेटिव्ह एज्युकेटर’ या जागतिक पुरस्काराने! त्यांची निवड संयुक्त राष्ट्रांच्या शिक्षण मोहिमेचे सदिच्छादूत म्हणूनही झालेली आहे.
रणजितसिंह डिसले,
जि.प.शाळा परितेवाडी
ता.माढा जि.सोलापूर


















Comments

Popular posts from this blog

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 Executive Summary) मराठी अनुवाद

                        राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५                           ( मराठी  अनुवाद)                      रणजितसिंह डीसले मी काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे.  अर्थात माझा हा असा १ ला प्रयत्न आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील. अगदी संक्षिप्त रुपात मी हि Executive Summary  मांडतोय.   प्रस्तावनेच्या सुरवातीला च हा आराखडा का बदलला ? कसा बदलला? यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे हे जाणवते. ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे  “भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या civilization and  Progress या निबंधातील हे वाक्य आहे. “ नवनिर्मिती चा उत्साह व निखळ आनंद हि बालकाची गुण वैशिष्ट्ये असून अविचारी प्रौढांच्या जगात ती उधवस्त होऊ शकतात.”   ( kindly remember it) यातून बालकेंद्री आराखडा सूचित करत आहेत असे जाणवते. सुरवातीच्या प्रकरणात १९४७

ASER 2014

मागील भागात प्रथम चा (व्यावसायिक) असर या लेखात मी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर प्रथम कडून आलेल्या अधिकृत प्रतीसाद्वारील विशेष लेख  भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील तमाम शिक्षण प्रेमी नागरिक हो!!!!!!!!!! प्रथम फाउंडेशन  तर्फे दरवर्षी प्रकाशित असर अहवालावर सदर लेखकाने काही प्रश्न उपस्थित केले होते. सदर प्रश्नाची उत्तरे प्रथम चे महाराष्ट्रातील प्रमुख सोमराज गिरडकर यांनी देण्याऐवजी सदर लेखकावर वैयक्तिक पातळीवर जात टीका केलीय. आहेत. त्यांनी ज्या तुच्छ , शेलक्या भाषेत  उत्तरे लिहिलीत ते पाहून मला एक नागरिक म्हणून क्लेश वाटतो. सदर लेखकावर चा राग त्यांच्या लिखाणातून दिसून येतो. मात्र असर अहवालाबाबत माझ्या मनात ज्या शंका  होत्या त्या सोमराज यांनी दिलेल्या उत्तरामुळे त्या अधिकच वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील तमाम शि क्षण प्रेमी नागरिकांची दिशाभूल करणारी उत्तरे त्यांनी दिलीत. मी निव्वळ पतंगबाजी करत नसून या लेखातून त्यांनी दिलेली उत्तरे किती शुध्द फसवणूक करणारी आहेत हे पुराव्यासह दाखवून देतो. मुळात मागील १० वर्ष्यात पहिल्यांदाच प्रथम तर्फे अधिकृत प्रतिसाद महाराष्ट्रातील तमाम श

ASER Report

प्रथम चा (व्यावसायिक) असर पुन्हा एकदा असर अहवाल प्रसिद्ध झाला. आणि नेहमीप्रमाणे सरकारी शाळांचे विदारक चित्र समोर आले. पण खरच हे चित्र इतके भयावह आहे का? हा अहवाल प्रसिद्ध करून प्रथम ला काही लाभ मिळतायेत का? या अवस्थेला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले. या लेखात मी एक शिक्षक ,एक पालक आणि एक नागरिक या ३ भूमिकांतून विचार मांडणार आहे. o     सर्वात अगोदर प्रथम या संस्थेविषयी जाणून घ्या. दिल्लीत मुख्यालय असलेली ही संस्था मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान च्या ४ थ्या मजल्यावरून कामकाज पाहते. या संस्थेला निधी हा परदेशी संस्थांकडून मिळतो. o     २००८-१० या कालावधीत गुगल ने निधी दिला o     . 2010: The Douglas B. Marshall Family Foundation o     2010 onwards: The William and Flora Hewlett Foundation  o     2013 onwards: Pratham USA           o     असा निधीचा ओघ सुरु आहे.. मग  माझ्या मनात एक नागरिक म्हणून असा विचार आला कि परदेशी संस्थांकडून निधी मिळवण्यासाठी तर ही संस्था वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे अहवाल प्रकाशित करत नाही ना?????  भारत शैक्षणिक दृष्ट्या अतिशय