नमस्कार ! तमाम पुणेकरांना नमस्कार ! थेट स्वर्गातूनच नमस्कार ! मी श्वेता .कोण श्वेता ? श्वेता ओस्वाल तर नव्हे? होय मी श्वेता ओस्वालच . स्वर्गातुनच बोलतेय , तेही यमराजाची खास परवानगी घेउनच.सुरुवातीला ते परवानगी देतच नव्हते , पण स्वारगेट बस डेपोतील बस घेऊन पृथ्वीवर जाईन असे म्हटल्यावर लगेच तयार झाले.
त्या संतोष मानेला दोष देणे बंद कराल का ? अहो रागाच्या भरात माणूस वागतो असे कधीतरी . मला इथे त्याची पहिली पत्नी भेटली होती. जिजाबाई नाव तिचे.किती घाबरलेली होती ती ! आजपण ती भिते त्याला. तिच्या आदित्यने गोटी गीळली होती. आता नवरा काय म्हणेल ? या भितीनेच तिचा जीव गेला होता. इतकी दहशत होती त्याची.मग अशा माणसाला जर कोणी जवळची बस दिली नाही तर मग तो बस पळवून असा आमचा जीव घेनारच ना ! पुणेकरांनो जरा रस्त्याने जाताना जपुनच जात जा. मी तर म्हणते कि जलप्रवासच सुरु करा. मी इथे पाहिलंय की एस्.टी. मध्ये म्हणे असे अनेक संतोष माने आहेत .परिवहन राज्यमंत्री सुद्धा म्हणतात की एस् .टी. मध्ये काम करायचे असेल तर लांबवर बस न्यावीच लागेल. बसचालकाने..रोजच लांबलचक प्रवास केलाच पाहिजे तो काय मंत्री आहे का ? त्याची एवढी काय काळजी घ्यायची ? बसचालकाला कशाला हवेत विश्रांतीगृह. आरामगृह तर आमच्यासाठी असतात .संतोष मानेने केवळ ९ जणांना तर मारलेय. ते तर सामान्य नागरिक होते. एखादा आमदार तर नाही की गेला . लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे. लोकशाहीत हे असेच असते. हे मंत्री काय सामान्य जनतेसाठी आहेत होय. त्यांना राज्याचा कारभार पहायचा आहे. मोठ्या शहरात असे लहानसहान हल्ले होतच असतात.एवढे काय त्यात ? सामान्य नागरिक इथे मरणाच्या वाटेवर असताना देखील नेत्रदान करतो करतो पण जिवंतपणी हे लोकप्रतिनिधी नागरिकांना मरणयातनाच सोसायला लावणार. हे राम ! म्हणत बापूजी गेले पण आज पावलोपावली हे राम ! म्हणायची वेळ येतेय ना . यमराज म्हणतात की इथे या आम्ही सगळ्यांची काळजी घेतो. तुम्हीच ठरवा आता. येते मी.
Comments
Post a Comment