मायक्रोसॉफ्ट
च्या वतीने जगभरातील उपक्रमशील शिक्षकांचे जागतिक संमेलन नुकतेच टोरोन्टो येथे पार
पडले. या संमेलनात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली होती.या
परिषदेचा थोडक्यात आढावा.
‘एज्युकेशन एक्शचेंज’ हे शिक्षणविषयक
जागतिक संमेलन म्हणजे जगभरातील तंत्रस्नेही शिक्षकांना आपले नाविन्यपूर्ण उपक्रम जागतिक स्तरावर सादर करण्याचे हक्काचे
ठिकाण.मायक्रोसॉफ्ट च्या वतीने मागील १०
वर्षापासून हे संमेलन आयोजित करण्यात येतेय.कॅनडाच्या १५० व्या स्वातंत्र्य
वर्षाचे औचित्य साधून यजमान पदाचा मान टोरोन्टो ला मिळाला. जगभरातील ३०० शिक्षकांना यासाठी निमंत्रित करण्यात आले
होते.भारतातील ८ शिक्षक यासाठी पात्र ठरले,यांपैकी ५ जण या संमेलनात प्रत्यक्ष
सहभागी होवू शकले. शिक्षकांच्या उपक्रम निवडीची प्राथमिक प्रक्रिया दरवर्षी एप्रिल
ते जुलै याकालावधीत पार पडते.यातून निवडले जातात
ते ‘मायक्रोसॉफ्ट इंनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्सपर्ट’. या प्राथमिक फेरीतून
निवडलेल्या शिक्षकांचे देशपातळीवर सादरीकरण घेतले जाते,व देशपातळीवरील
सर्वोत्कृष्ट उपक्रम जागतिक संमेलनासाठी निवडले जातात.अर्थात ज्यांना या संमेलनात
प्रत्यक्ष सहभागी होता येणार नाही त्यांच्याकरिता एक दिवसाचे सत्र थेट प्रक्षेपित
केले जाते. शिक्षकांना अनेकविध प्रशिक्षणे, activities ,चर्चासत्र असा भरगच्च
कार्यक्रम जागतिक संमेलनासाठी आखलेला असतो
. एका तासात आपल्या बोटाच्या आकाराचा सेन्सर तयार करण्याची activity यावर्षी हिट
ठरली.या संमेलनात सहभागी शिक्षक आपापले उपक्रम सादर करतात. इतर
देशातील ज्या शिक्षकांचे उपक्रम आपल्याला आवडतील त्याच्यासोबत ते शिक्षक सामंजस्य करार करून त्या उपक्रमाची
अंमलबजावणी त्यांच्या शाळेत करू शकतात.अनेक
शिक्षक पुढील शैक्षणिक वर्ष्यात राबवायच्या सामुहिक उपक्रमांची आखणी देखील इथे करत
असतात. इतर देशातील शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची,त्यांच्यासोबत गटकार्य करण्याची
, त्यांचे काम जवळून पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळत असते. विद्यार्थ्याच्या
मानसिकतेतून या संमेलनात सहभागी झालात तर खूप काही शिकण्याची संधी मिळत असते.
‘चला भविष्य घडवूया’
ही यावर्षीच्या संमेलनाची थीम. शिक्षण क्षेत्रात भविष्यात येणाऱ्या समस्या
कोणत्या? भविष्यासाठी शैक्षणिक तंत्रज्ञान कसे असेल? भविष्यात शिक्षकांची भूमिका
काय असेल? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या संमेलनात झाला.दरवर्षीच्या
थीमवर आधारित एक स्पर्धा देखील यादरम्यान आयोजित केली जाते. वैयक्तीक व सामुहिक
अशा दोन गटात ही स्पर्धा रंगते.कोणतीही एक शैक्षणिक समस्या निवडून त्याचे निराकरण
कसे करता येईल? याचे सादरीकरण वैयक्तिक व सामूहिकरीत्या करण्याची संधी प्रत्येकाला
मिळत असते. आमच्या गटात अमेरिका,केनिया,इजिप्त व जपान या देशातील शिक्षक होते. संमेलनात
सहभागी शिक्षकांची संख्या पाहता या संमेलनावर महिला शिक्षिकांचा वरचष्मा असल्याचे
स्पष्टपणे दिसून येते. दरवर्षीदेखील महिला शिक्षिकांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त
असल्याचे आयोजकांचे निरीक्षण आहे.जगभरातील
महिला शिक्षिकांची शिक्षकी पेशाप्रती असणारी व्यावसायिकता मला अनुकरणीय वाटते . सहभागी शिक्षकांच्या शाळांचे
वर्गीकरण अभ्यासले असता सरकारी शाळांतील शिक्षक संख्या जास्त असल्याचे दिसून आले.भारताच्या
तुलनेत प्रगत समजल्या जाणाऱ्या अनेक देशात सरकारी शाळांमधील शिक्षण हे सर्वोत्तम
दर्ज्याचे असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. दर्जेदार शिक्षण मिळणे हा मुलांचा
हक्कच आहे अशी त्या देशांतील शिक्षकांची भावना आहे.शिक्षक म्हणून कालानुरूप
व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याकडे बहुतांश देशातील शिक्षकांचा कल असल्याचे
जाणवले.विशेष म्हणजे व्यावसायिक कौशल्ये विकसित करणे ,परदेशातील शिक्षण पद्धतीचा अभ्यास
करणे याकरिता ऑस्ट्रिया व ट्युनिशिया या देशांनी शिक्षकासाठी
विशेष निधी राखून ठेवला आहे. संमेलनात
सहभागी शिक्षकांशी केलेल्या संवादातून एक बाब निदर्शनास आली ती म्हणजे प्रशासनाकडून वारंवार मागितल्या जाणाऱ्या माहितीमुळे अविकसित व विकसनशील देशातील शिक्षक
त्रस्त आहेत . विकसित देशांनी मात्र
उपलब्ध माहितीचे पृथ्थकरण व संस्करण करण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. लहान
मुलांना वर्गात tab वापरू द्यावे कि नाही ? याबाबत मतभिन्नता असली तरी शिक्षकांनी मात्र tab/laptop
वापरावा यावर मात्र एकमत झाले . जगभरातील शिक्षकांना वर्ग अध्यापनात जाणवणाऱ्या समस्यांमध्ये
पुष्कळसे साम्य आहे.या समस्यांवर शोधलेले उपाय व्यक्तिपरत्वे , राष्ट्र्परत्वे वेगवेगळे असले तरी देखील एकाच समस्येवर किती
वैविध्यपूर्ण उपाय शिक्षक शोधू शकतात हे अशा संमेलनातून अनुभवता येते.मुळात शिक्षण
क्षेत्रात तंत्रज्ञान वापरायचे म्हणजे
नेमकं काय करायचं असत? याच उत्तर या शिक्षकांशी केलेल्या गटकार्यातून मिळाले. केवळ
tab वा प्रोजेक्टरवर विशिष्ट app चा वापर करणे , व्हिडीओ दाखवणे या पलीकडेदेखील तंत्रज्ञान वापरता येते हे आम्ही -
भारतीय शिक्षकांनी, समजून घ्यायला हवे. मुलांच्या अध्ययन क्षमतेचे मापन करून ,
प्राप्त माहितीच्या आधारे सुयोग्य निष्कर्ष काढण्यासाठी तंत्रज्ञान वापरले जावे
असे बहुतांश शिक्षकांचे मत आहे.अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही कोणत्या क्षमता विकसित करत आहोत ? याचा विचार करायला हवा. एकीकडे गणित , बुद्धिमत्ता
चाचणी च्या पेपर मधून स्कॉलर निवडण्याकडे आमच्या शिक्षकांचा कल वाढत आहे , तर
दुसरीकडे लहान वयातच कोडींगच्या माध्यमातून मुलांची तर्कक्षमता विकसित करण्याकडे वेली
हेल्ट सारख्या शिक्षकांचा कल आहे . दोन्ही देशातील शिक्षकांना त्यांच्या शाळेतील मुलांची तर्कक्षमताच विकसित करायची आहे, मात्र यासाठी त्यांनी
निवडलेले मार्ग भिन्न दिसून येतात.अन या शिक्षकांनी निवडलेल्या वेगवेगळ्या उपायांमध्ये त्या - त्या देशांच्या मनुष्यबळ
विकासाचे रहस्य लपलेले आहे. एकीकडे २१व्या वर्षात पदार्पण केलेली भारतीय मुलगी तिच्या
लग्नाचा खर्च वडिलाना कर्जाच्या खाईत घेवून जाईल असे
कारण देत आत्महत्येचा मार्ग निवडत आहे , तर दुसरीकडे वेली हेल्ट या शिक्षकाची यांची मुले
२०व्या वर्षी नासा सारख्या संस्थेत आपले शैक्षणिक उपयोजन करत आहेत , कॉर्पोरेट
परीभाषेत सांगायचे तर ती ‘एम्प्लॉएबल’ झालेली आहेत.. देशाचे भावी नागरिक म्हणून
मुलांची विचार क्षमता आम्ही कोणत्या साधनांचा, तंत्रज्ञानाचा अवलंब करून कोणत्या मार्गाने विकसित करत आहोत ?
याचे उत्तर आम्हा शिक्षकांनाच द्यावे लागेल.
रणजितसिंह
डिसले.
Comments
Post a Comment