अत्यावश्यक
सेवा व काही अपवाद वगळता इतर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना
५ दिवसाचा आठवडा करण्याचा निर्णय शासनाने २४ फेब्रुवारी रोजी काढलेल्या परिपत्रकातून जाहीर केला. सरकारी कर्मचाऱ्यांवर असणारा कामाचा ताण लक्षात घेता , हा निर्णय स्वागतार्ह ठरतो. या निर्णयाचा लाभ शिक्षकांनादेखील दिला जावा अशी मागणी शिक्षक आमदार आणि काही खासदार करू लागले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ५ दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे सुचवले आहे.या सर्व घटना पाहता शिक्षकांकरिता ५ दिवसांचा आठवडा असावा कि नाही, असलाच तर कामाच्या तासांचे स्वरूप कसे असावे याबाबत सखोल विचारमंथन होणे गरजेचे वाटते.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील प्रकरण ४ कलम १९ (ए) मधील मानके व निकष यांच्या स्पष्टीकरणार्थ २९ एप्रिल २०११ रोजीच्या परिपत्रकानुसार १ली ते ५ वी च्या शिक्षकांकरिता एका शैक्षणिक वर्षात किमान २०० दिवस काम करणे (८०० घड्याळी तास अध्यापन करणे ) व ६ वी ते ८ वी च्या शिक्षकांनी २२० दिवस काम करणे ( १००० तास अध्यापन करणे) बंधनकारक आहे.प्रत्येक शिक्षकासाठी प्रत्येक आठवड्याला अध्यापनाचे किमान ४५ तास राहतील असेही या परिपत्रकात नमूद केलेले आहे. किती दिवसांचा आठवडा असावा यापेक्षा आठवड्यात किती
तास अध्यापन करावे आणि वर्षभरात किती दिवस काम करावे याबाबत संदर्भीय परिपत्रक स्पष्टीकरण देते. आठवड्यातील कामाचे तास व वर्षातील एकूण दिवस यांचा मेळ घालत कायद्याच्या चौकटीत राहून शिक्षकांनादेखील ५ दिवसांचा आठवडा लागू केला जाऊ शकतो. राज्यातील काही शाळांनी पूर्वीपासूनच असा ५ दिवसांचा आठवडा लागू केलेला आहे.
मात्र अशा निर्णयामुळे शिक्षकांवरील कामाचा ताण कमी होत नसल्याचे दिसून आले आहे. शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी सुरु झाल्यापासून शिक्षकांवरील वर्क लोड वाढला आहे. आजच्या घडीला अध्यापनाव्यतिरिक्त ६८ प्रकारची कामे शिक्षक करीत आहेत.द्विशिक्षकी शाळेत तर अनेक दिवस मुलांना गुरुजींचे दर्शन होत नाही. राज्यातील सरकारी शाळेतील शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त इतर कामांचे आदेश देण्यामध्ये निवडणूक विभाग , आरोग्य विभाग , महिला व बालकल्याण विभाग, जातपडताळणी अधिकारी, ग्रामविकास विभाग , व केंद्र शासनाचे विविध विभाग आघाडीवर आहेत . ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही कार्यप्रणाली एकाचवेळी सुरु असल्याने निर्माण झालेला गोंधळ अजून मिटलेला नाही.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहितीचा कागद मागितला नाही असा दिवस कधी येईल याची शिक्षक वाट बघत आहेत. मुलांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी संवेदनशील असणारे शिक्षण खाते शिक्षकांच्या खांद्यावरील कामाचे ओझे कमी करण्यासाठी कमालीचे असंवेदनशील आहे. प्रोफेसर यशपाल समितीने आशयात्मक ओझे करून शिक्षकांना अध्यापनपूर्व तयारीसाठी अधिक वेळ देण्याबाबत शिफारस केली होती.मात्र मुलांना वर्षातून दोनदा
पुस्तके देण्याचा उपाय शोधून शिक्षकांच्या मूळ समस्येकडे दुर्लक्ष केले आहे.वर्षभरातून दोनदा पुस्तके दिल्याने बालभारती व पुस्तक वाहतूकदार यांचा जास्त फायदा होणार कि मुलांचा हे येणाऱ्या काळात समजून येईल. OECD ने प्रकाशित केलेल्या एज्युकेशन अॅट अ ग्लान्स २०१८ या शैक्षणिक अहवालात भारतातील शिक्षकांचे कामाचे तास कमी करण्याचे सुचवले आहे. जास्त वेळ काम केल्याने कामाची गुणवत्ता कमी होत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. कॅनडा, जपान,इटली , स्पेन यांसारख्या प्रगत देशातील शिक्षक वर्षभरात सरासरी ६०० तास अध्यापन करतात. स्पेनमध्ये तर प्रतिदिन केवळ ३ तास अध्यापनासाठी ठेवलेले आहेत.शिक्षकांच्या कामाचे तास आणि कामाची गुणवत्ता याबाबत ग्लोबल टीचर स्टेटस इंडेक्स २०१८ हा अहवाल अतिशय महत्वपूर्ण शिफारशी करतो. शिक्षकांचा वर्क लोड कमी केला व कामाचे तास कमी केले तर त्यांची कामगिरी अधिक उंचावते असे हा अहवाल दाखवून देतोय. मुलांनी जास्तीत जास्त जास्त वेळ शाळेत राहावे आणि शिक्षकांनी देखील जास्त वेळ शिकवावे असे जगातील ८७ देशातील पालकांना वाटते. मात्र कॅनडा, चीन, जपान व इंडोनेशिया या ४ देशांतील शिक्षक व पालक याला अपवाद आहेत. या चार देशांतील शिक्षक प्रतिदिन सरासरी अडीच ते तीन तास काम करतात . आणि यावेळात ते त्यांची सर्वोत्तम कामगिरी पार पडत असतात. मात्र महाराष्ट्रातील शिक्षकांवरील
कामाचा अतिरिक्त ताण लक्षात घेता प्रतिदिन सर्वोत्तम कामगिरी करण्याची शिक्षकांची क्षमता कमी होत आहे असे दिसून येतेय.
शिक्षक हा
देशाच्या मनुष्यबळाच्या विकासातील पाया आहे. मात्र इतर खात्याप्रमाणे शिक्षण खात्यात देखील मुलांच्या कौशल्य विकसनापेक्षा
कागदावर दिसणारी गुणवत्ता याला अधिक महत्व मिळू लागले आणि हा पाया ढासळू लागला. हा पाया अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक शाळांमध्ये वर्क कल्चर विकसित करायला हवे. शिक्षकांकरिता ५ दिवसांचा आठवडा करीत असतानाच त्यांच्या खांद्यावरील कामाचे ओझे कमी झाले तरच त्यांची कामगिरी सुधारून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा पूर्ण होईल.
Comments
Post a Comment