Skip to main content

समर स्कूल : भविष्याचे शिक्षण देणाऱ्या शाळा...





                                           
                                      शिक्षकांनी त्यांच्या  अध्यापन पद्धतीत कालानुरूप बदल केले पाहिजेत ,  त्याकरिता त्यांनी स्वयंप्रेरणेने  प्रशिक्षण घ्यायला हवे  असे जगभरातील अनेक शिक्षणतज्ञांना वाटते . सर्व शिक्षा अभियान असो  वा राष्ट्रीय माध्यमिक  शिक्षा अभियान असो यामधून  प्रशिक्षणांचा  झालेला अतिरेक , शिक्षकांच्या गरजा न ओळखता त्यांवर  लादण्यात आलेली प्रशिक्षणे यामुळे  सेवांतर्गत प्रशिक्षणाबाबत महाराष्ट्रातील शिक्षकांचा नकारात्मक प्रतिसाद अनुभवायला मिळत होता.  सेवांतर्गत प्रशिक्षणाबाबत  शिक्षकांची  ही नकारात्मक मानसिकता लक्षात घेवून सन २०१५ पासून  ट्रेनिंग ऑन  डिमांड (मागेल त्यालाच प्रशिक्षण )  या धोरणाचा स्वीकार राज्याच्या शिक्षण विभागाने केला.  त्यामुळे सध्या  नियोजनशून्य व उद्देशविरहीत प्रशिक्षणाचे आयोजन करण्याच्या प्रकारांना काहीसा आळा बसल्याचे चित्र आहे. शिक्षकांनी त्यांना आवडेल त्या विषयाच्या प्रशिक्षणाची मागणी विद्या प्राधिकरणाच्या वेबसाईटवर नोंदवावी आणि मग त्या विषयाच्या प्रशिक्षणाकरिता आवश्यक शिक्षक संख्या एकत्रित करून संबंधिताना  त्यांच्या आवडीचे प्रशिक्षण  द्यायचे अशी कार्यप्रणाली अमलात आली.  सद्यास्थितीत शिक्षकांच्या आवडीच्या विषयामध्ये शैक्षणिक तंत्रज्ञान हा विषय आघाडीवर असून वर्गाध्यापनात तंत्रज्ञान  वापराबाबत  प्रशिक्षण देण्याची मागणी  करणाऱ्या शिक्षकांची संख्या ( जानेवारी १८ अखेर पर्यंत )  सर्वाधिक म्हणजे 1,61,734 इतकी आहे. ही आकडेवारी लक्षात घेता  सेवांतर्गत प्रशिक्षणाबाबत महाराष्ट्रातील शिक्षकांची नकारात्मक मानसिकता बदलली आहे असे निश्चितपणे म्हणता येईल.  युडायस अहवालानुसार महाराष्ट्रातील सरासरी १३ % शिक्षक दरवर्षी सेवांतर्गत प्रशिक्षण घेत असतात.देशभरातील प्राथमिक शिक्षकांचा विचार केला तर सरासरी २२ % शिक्षक दरवर्षी सेवांतर्गत प्रशिक्षण घेतात.    
                                          मात्र प्रशिक्षणाचे विषय निवडीचे स्वातंत्र्य हा बदल वगळता सेवांतर्गत प्रशिक्षणे आयोजित करण्याची पद्धत अद्यापही बदलेली नाहीये.  प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी शालेय कामकाजाचे दिवस निवडले जात असल्याने त्या कालावधीत वर्गाध्यापन व इतर शैक्षणिक कृती स्थगित कराव्या लागतात.शिक्षकांमधीलच काही जणांना किंवा   DIECPD  मधील विषय सहायकांना अथवा क्वचित प्रसंगी अधिकारी वर्गाला राज्यस्तरावर प्रशिक्षित करून त्यांच्यामार्फत इतर शिक्षकांना जिल्हा, तालुका व केंद्र स्तरावर प्रशिक्षित केले जाण्याची पूर्वापार चालत आलेली पद्धत अद्यापही सुरूच आहे.  अशा राज्यस्तरीय मार्गदर्शकांना             ( ज्यांना सध्या सुलभक म्हटले जाते )   वेगवेगळ्या विषयांचे  प्रशिक्षण द्यावे लागत असल्याने  प्रत्येक प्रशिक्षण विषयातील आशयज्ञान प्रभावीपणे मांडण्याच्या त्यांच्या क्षमतेला मर्यादा येतात. परिणामी असे सुलभक  आपल्या सहकारी शिक्षकांना देत असलेल्या प्रशिक्षणाचा दर्जा खालावण्याची शक्यता वाढते. शिवाय अशा सुलभकाना वेगवेगळ्या स्तरावर वारंवार प्रशिक्षण द्यावे लागत असल्याने वर्ग अध्यापनाच्या महत्वाच्या कार्याकडे त्यांचे दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशा परिस्थितीत सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी  व शिक्षकांच्या व्यावसायिक कौशल्य विकासासाठी  समर स्कूलच्या पर्यायाची प्रभावी अंमलबजावणी करायला हवी. देशाचे भविष्य ज्या वर्गाखोल्यांमध्ये घडवले जातेय त्या वर्गखोलीतील महत्वपूर्ण घटक असणाऱ्या शिक्षकांकरिता समर स्कूल या भविष्य घडवणाऱ्या शाळा ठरतील. दीर्घ सुट्टीच्या कालावधीत किंवा  शैक्षणिक सत्राखेरीस आयोजित केले जाणारे हे विशेष प्रशिक्षण वर्ग  राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी व्यावसायिक विकासाच्या नव्या संधी निर्माण करू शकतात.  किमान २ आठवड्याच्या कालावधीत आयोजित केली जाणारी ही  विशेष प्रशिक्षण सत्रे  शिक्षकांना त्यांच्या आवडीच्या विषयातील अद्ययावत माहितीची ओळख करून देत  अनुषंगिक  तंत्र कौशल्य आत्मसात करण्याची संधी देतात . ऑनलाईन माध्यमातून   अथवा  प्रशिक्षण केंद्रामध्ये  प्रत्यक्ष सहभागी होऊन   अधिक अनुभवी व  जाणकार  व्यक्तींकडून  थेट मार्गदर्शन मिळाल्यामुळे स्वतःमधील बदल अनुभवण्याची संधी  शिक्षकांना मिळू शकेल.  शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण विचारधारांची ओळख, प्रत्यक्ष कृतीद्वारा कौशल्य विकसन,आवडीच्या विषयातील तज्ञ व अनुभवी मार्गदर्शकांचे थेट मार्गदर्शन व  शंका निरसन , उद्दिष्टनुरूप कृती आराखडा आखणी व अंमलबजावणी करण्याची संधी यानिमित्ताने मिळू शकेल. आजही सेवापूर्व व सेवांतर्गत प्रशिक्षण वर्गात पाठाचे नियोजन करताना हर्बर्टच्या पंचपदीचा आधार घेतला जातो. काळानुरूप ही पद्धत बदलली जाणे आवश्यक आहे. मागील काही वर्षात क्लासरूम मॅनेजमेंट ,चाईल्ड बिहेव्हीअर अॅनालीसीस , फ्लीप्ड क्लासरूम, ब्लेंडेड लर्निंग यांसारख्या नवनवीन संकल्पनांना  महत्व प्राप्त झाले आहे. अनेक देशांमध्ये प्राथमिक शाळेतील शिक्षकांना त्यांच्या शासनाच्या वतीनेच समर स्कूलच्या माध्यमातून अशा अद्ययावत संकल्पनांची ओळख करून देत अधिक  प्रशिक्षित केले जाते. मात्र महाराष्ट्रातील   शिक्षकांना शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात याविषयी माहिती दिल्याचे  अथवा भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षित केल्याचे उदाहरण ऐकिवात नाही.  
                                     समर  स्कूलचा हा पर्याय महाराष्ट्रातील  शिक्षकांसाठी अतिशय प्रभावी ठरू शकतो. किमान ३० दिवसांची उन्हाळी सुट्टी महाराष्ट्रातील  शिक्षकांना दरवर्षीच  मिळत असते. या कालावधीत शिक्षकांनी आपल्या आवडीच्या  समर स्कूल मध्ये सहभाग नोंदवून  शिक्षण क्षेत्रातील बदलत्या अध्यापन पद्धती, नवनवीन तंत्रे आत्मसात  करण्याचा प्रयत्न करायला हवा. जगभरातील अनेक शिक्षक अशा समर स्कूलच्या माध्यमातून स्वतःच्या व्यावसायिक कौशल्य विकसनास प्राधान्य देत आहेत. अशा समर स्कूल मधून समविचारी शिक्षकांचे एक नेटवर्क तयार होवून परस्पर सहकार्यातून क्षमतावृद्धी करण्याच्या प्रयत्नास  चालना मिळते.अर्थात हा पर्याय पडताळून पाहताना  त्यातील नाविण्यता व अद्ययावतपणा कायम राखला जाणे महत्वाचे आहे. तसेच अशा समर स्कूलमधील शिक्षकांचा सहभाग हा पूर्णतः ऐश्चिक असावा .अन्यथा हे प्रशिक्षण वर्ग म्हणजे नसती उठाठेव अशी मानसिकता तयार होऊन शिक्षक नकारात्मक प्रतिसाद देण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे प्रशिक्षण वर्ग जिल्हा स्तरावरील सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या माध्यमातून आयोजित केले जावेत. याकरिता नेमण्यात येणारे सुलभक प्राथमिक शिक्षक नसावेत  त्यामुळे त्या संबंधित शिक्षकाला त्याच्या आवडीच्या वर्गात प्रवेश घेण्याची संधी मिळेल. समर स्कूल मध्ये तज्ञ मार्गदर्शक, आशय निश्चित्ती व नियोजन कार्यात   विद्यापीठे, नामांकित प्रशिक्षण संस्था यांचे सहकार्य घ्यावे . प्रसंगी  खाजगी क्षेत्रातील तज्ञांची मदत घेता येवू शकेल. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात सेवा देणारा शिक्षक कोणत्याही जिल्ह्यातील समर स्कूल मध्ये प्रवेशित होवू शकेल इतपत  लवचिकता त्याच्या अंमलबजावणी मध्ये असायला हवी.  
                                चौथ्या  औद्योगिक क्रांतीच्या या युगात तंत्रज्ञानाच्या व्यापकतेमुळे   शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकांमध्ये अमुलाग्र बदल संभवतात. हे बदल स्वीकारून एकविसाव्या शतकातील  मुलांना कालानुरूप शिक्षण देण्यासाठी  विसाव्या शतकात जन्मलेल्या शिक्षकांना  अधिक प्रयत्न करावे लागतील. शिक्षकांनी फॅसीलीटेटरच्या  भूमिकेतून बाहेर पडून मुलांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना  व कुतूहल  यांना अधिक पाठबळ देण्याची गरज आहे.    RTE च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ६-१४ वयोगटातील ९० % हून अधिक मुलांना शाळेत दाखल करण्यात व टिकवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. आता या मुलांचे भविष्य घडवणारे शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना अधिक सक्षम करण्याच्या दिशेने वाटचाल करायला हवी. अद्ययावत आशयज्ञान  ,  आधुनिक अध्यापन पद्धतीचा वापर आणि तंत्रज्ञान वापरातून शैक्षणिक समस्या निराकरण करण्यातील प्रभुत्व  या त्रिसूत्रीच्या आधारे आपली वाटचाल करण्यासाठी शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने पुढे यायला हवे.
रणजितसिंह डिसले


Comments

Popular posts from this blog

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 Executive Summary) मराठी अनुवाद

                        राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५                           ( मराठी  अनुवाद)                      रणजितसिंह डीसले मी काही ठिकाणी भाषांतर तर काही ठिकाणी मत मांडले आहे.  अर्थात माझा हा असा १ ला प्रयत्न आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपणास आज सुरु असलेल्या बदलामागील विचार समाजतील. अगदी संक्षिप्त रुपात मी हि Executive Summary  मांडतोय.   प्रस्तावनेच्या सुरवातीला च हा आराखडा का बदलला ? कसा बदलला? यातील सहभागी मान्यवर यांचा उल्लेख आहे. ,बदलामागील मुख्य दृष्टीकोन ओझ्याविना अध्ययन हाच आहे हे जाणवते. ज्या प्रमाणे स्वतंत्र भारताच्या १ ल्या शिक्षण धोरणात वा कुठेतरी एक वाक्य मी वाचलेय ते म्हणजे  “भारताचे भविष्य वर्गखोलीत घडवले जात आहे ”. अगदी तसेच एक वाक्य यात आहे.कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या civilization and  Progress या निबंधातील हे वाक्य आहे. “ नवनिर्मिती चा उत्साह व निखळ आनंद हि बालकाची गुण वैशिष्ट्ये असून अविचारी प्रौढांच्या जगात ती उधवस्त होऊ शकतात.”   ( kindly remember it) यातून बालकेंद्री आराखडा सूचित करत आहेत असे जाणवते. सुरवातीच्या प्रकरणात १९४७

ASER 2014

मागील भागात प्रथम चा (व्यावसायिक) असर या लेखात मी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर प्रथम कडून आलेल्या अधिकृत प्रतीसाद्वारील विशेष लेख  भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील तमाम शिक्षण प्रेमी नागरिक हो!!!!!!!!!! प्रथम फाउंडेशन  तर्फे दरवर्षी प्रकाशित असर अहवालावर सदर लेखकाने काही प्रश्न उपस्थित केले होते. सदर प्रश्नाची उत्तरे प्रथम चे महाराष्ट्रातील प्रमुख सोमराज गिरडकर यांनी देण्याऐवजी सदर लेखकावर वैयक्तिक पातळीवर जात टीका केलीय. आहेत. त्यांनी ज्या तुच्छ , शेलक्या भाषेत  उत्तरे लिहिलीत ते पाहून मला एक नागरिक म्हणून क्लेश वाटतो. सदर लेखकावर चा राग त्यांच्या लिखाणातून दिसून येतो. मात्र असर अहवालाबाबत माझ्या मनात ज्या शंका  होत्या त्या सोमराज यांनी दिलेल्या उत्तरामुळे त्या अधिकच वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील तमाम शि क्षण प्रेमी नागरिकांची दिशाभूल करणारी उत्तरे त्यांनी दिलीत. मी निव्वळ पतंगबाजी करत नसून या लेखातून त्यांनी दिलेली उत्तरे किती शुध्द फसवणूक करणारी आहेत हे पुराव्यासह दाखवून देतो. मुळात मागील १० वर्ष्यात पहिल्यांदाच प्रथम तर्फे अधिकृत प्रतिसाद महाराष्ट्रातील तमाम श

ASER Report

प्रथम चा (व्यावसायिक) असर पुन्हा एकदा असर अहवाल प्रसिद्ध झाला. आणि नेहमीप्रमाणे सरकारी शाळांचे विदारक चित्र समोर आले. पण खरच हे चित्र इतके भयावह आहे का? हा अहवाल प्रसिद्ध करून प्रथम ला काही लाभ मिळतायेत का? या अवस्थेला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले. या लेखात मी एक शिक्षक ,एक पालक आणि एक नागरिक या ३ भूमिकांतून विचार मांडणार आहे. o     सर्वात अगोदर प्रथम या संस्थेविषयी जाणून घ्या. दिल्लीत मुख्यालय असलेली ही संस्था मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान च्या ४ थ्या मजल्यावरून कामकाज पाहते. या संस्थेला निधी हा परदेशी संस्थांकडून मिळतो. o     २००८-१० या कालावधीत गुगल ने निधी दिला o     . 2010: The Douglas B. Marshall Family Foundation o     2010 onwards: The William and Flora Hewlett Foundation  o     2013 onwards: Pratham USA           o     असा निधीचा ओघ सुरु आहे.. मग  माझ्या मनात एक नागरिक म्हणून असा विचार आला कि परदेशी संस्थांकडून निधी मिळवण्यासाठी तर ही संस्था वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे अहवाल प्रकाशित करत नाही ना?????  भारत शैक्षणिक दृष्ट्या अतिशय