Courtesy: facebook.com/NeeruMittal |
जगभरातील शिक्षकांचे लक्ष वेधून घेणारी घटना नुकतीच
सिंगापूर येथे घडली. जगभरातील नवोपक्रमशील शिक्षकांचे तीन दिवशीय संमेलन नुकतेच
सिंगापूर येथे पार पडले. याकरिता ९४ देशांतील ४०० हुन अधिक शिक्षकांना निमंत्रित
करण्यात आले होते. मायक्रोसॉफ्टच्यावतीने
आयोजित हे संमेलन एज्युकेशन एक्सचेंज या नावाने ओळखले जाते. संमेलनाचे हे ४ थे वर्ष आहे.
वर्गाध्यापनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
करून मुलांच्या अध्ययन क्षमतेवर विशेष प्रभाव टाकणाऱ्या शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण
प्रयोगांना जागतिक व्यासपीठ देण्याचा हा प्रयत्न आहे. एक शिक्षक म्हणून स्वतःच्या
व्यवसायिक विकासाची संधी देणारे हे संमेलन अनेक अर्थाने महत्वाचे ठरते. जगभरातील
हे सर्व आमंत्रित शिक्षक वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले जातात अन वर्गाध्यापनात भेडसावणारी
कोणतीही एक समस्या निवडून त्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय शोधण्याचा प्रयत्न
करीत असतात. भिन्न भाषा, भिन्न देश अन भिन्न संस्कृती अशा प्रतिकूल परिस्थितीत हे सर्व शिक्षक एकत्र
येवून काम करतात. यामुळे इतर देशांमधील शिक्षण पद्धती बाबत माहिती घेण्याची संधी
मिळते, व्यावसायिक कार्यसंबंध
तयार होवून हे विश्वची माझे घर ही विचारधारा प्रत्यक्षात अंगिकारली जातेय.
या जागतिक परिषदेत घानाच्या एका शिक्षकाने सर्वांचे लक्ष
वेधून घेतले. रिचर्ड अकोटो असे त्याचे नाव. घानामधील सेकायेडोमसे नावाच्या
खेड्यातील बेन्टनसे ज्युनिअर हायस्कूलमध्ये शिकवणारा हा शिक्षक. घाना हा आफ्रेकीतील गरीब देश म्हणून
ओळखला जातो. शिक्षणाविषयी फारशी जागृती नसणाऱ्या समाजात काम करणाऱ्या रिचर्डने एक
अफलातून काम केलेय. ज्या भागात रोजच्या खाण्याची भ्रांत आहे तिथल्या भागात संगणक
शिक्षण म्हणजे चैनच समजली जाईल. शाळेत वीज असण्याची शक्यताच नव्हती. संगणक नाहीत, वीज नाही अन तंत्रज्ञानाचे
शिक्षण तर द्यायचं. कसे सोड्वायचे हे कोडे
? लोकसहभागातून अशी साधने मिळवण्याचा पर्याय त्याच्यापुढे नव्हता कारण सारा समाजच
हातावर पोट असणारा. कुठून आणणार एवढा पैसा?? यावर उपाय म्हणून या शिक्षकाने खडू व फळ्याचा कल्पक वापर
केला. रिचर्डच्या वर्गातील फळा म्हणजे
संगणकाची स्क्रीन व खडू म्हणजे संगणकाचा माउस. वर्ड, एक्सल, पॉवरपॉईट सारखे घटक शिकवण्यासाठी
वर्गातील फळ्यावर त्यातील सर्व मेन्यूबार चे चित्र काढून तो घटक शिकवायचा , अशी
याची जगावेगळी पद्धत. संगणकाच्या स्क्रीनवर ज्या रंगसंगतीमध्ये मेन्यूबार दिसतो
अगदी त्याच प्रकारे तो संपूर्ण फळा रंगवून काढायचा. प्रत्येक ऑप्शनला क्लिक
केल्यावर कोणकोणते सब ऑप्शन दिसतात त्याचेही चित्र काढून तो मुलांना शिकवतो.
सोबतचे चित्र पाहून तुम्हाला लक्षात येईल याची जगावेगळी तंत्रस्नेही अध्यापन
पद्धत.
Courtesy: Facebook.com/Owura Kwadwo Hottish |
मुलांमध्ये असणारी तंत्रज्ञानाविषयीची आवड पाहून मला अशी अफलातून
कल्पना सुचली असे रिचर्ड म्हणतो. त्याच्या वर्गातील मुलांनादेखील त्याचे हे
रंगीबेरंगी फळे अन त्यातून डोकावणारी विंडो हे सांर आवडतय. फळ्याच्या आकारात
संगणकाची स्क्रीन साकारून मुलांना एक वेगळाच अनुभव देणाऱ्या रिचर्डला त्याचे अनुभव
सांगण्यासाठी सिंगापूर येथे आमंत्रित करण्यात आले होते. माझा देश सोडून मी
पहिल्यांदाच दुसऱ्या देशात आलोय. मला इंग्रजी फारशी समजत नाही, माझ्या मुलांना देखील
इंग्रजी येत नाही. पण मला माझ्या वर्गातील मुलांच्या मनाची भाषा येते असे म्हणत
त्याने उपस्थितांची मने जिंकून घेतली. प्रतिकूल परिस्थिती हीच माझी प्रेरणा आहे
असे तो म्हणाला. यापूर्वीही मी संगणकाचे अनेकविध घटक अशाच पद्धतीने शिकवले आहेत.
माझ्या वर्गात १०० हून अधिक मुले आहेत आणि माझी ही कृती मुलांना आवडते , त्यातून ते शिकतात म्हणून
मी हे फळे रंगवतो असे तो म्हणाला. काही वर्षापूर्वी रिचर्डने स्वतःकरिता एक संगणक
घेतला होता मात्र तो चोरीला गेला. तेंव्हापासून मी अशापद्धतीने शिकवत असल्याचे
त्याने नमूद केले.त्याच्या या प्रयत्नांना आता घानाच्या एका स्वंयसेवी संस्थेने
साथ देण्याचे ठरवले असून रिचर्डच्या शाळेत काही संगणक व वीज सुविधा उपलब्ध करून
देण्याचे ठरवले आहे.
रिचर्डच्या या अफलातून कामगिरीनंतर ग्रीसच्या अजीलीकी पापा
नामक महिला शिक्षकेने आपल्या सादरीकरणातून अनेकांना प्रेरित केले. डिस्लेक्सियाग्रस्त
मुलांकरिता शाळा चालवणारी ही शिक्षिका. मानवी मेंदूमध्ये मजकूर वाचन करण्यासाठीचा
विशिष्ट भाग नाहीये असे तिचे म्हणणे आहे. सन १९९८ पासून ती डिस्लेक्सियाग्रस्त
मुलांकरिता काम करतेय. इमर्सिव्ह रीडर तंत्रज्ञानाच्या मदतीने या मुलांना एक
आत्मविश्वास देत अनेकांचे जीवन योग्य दिशेने नेण्यात तिने मोलाचे योगदान दिले आहे.
ही मुले इतरांपेक्षा वेगळी नसून , प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा यांचा दृष्टीकोण
वेगळा आहे. त्यामुळे अशा मुलांना त्यांची नजरेतून शिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवे
असे मत तिने व्यक्त केले.
या लेखात उल्लेखित दोन शिक्षक जगावेगळे आहेत. समस्यांकडे
पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोण वेगळा आहे.त्यांना जाणवलेल्या समस्या तुम्हाला देखील
जाणवल्या असतील. मात्र त्यांनी शोधलेले उपाय त्यांच्या नाविन्यपूर्णतेची ओळख
निर्माण करतात. त्यांनी शोधलेले उपाय तुम्हीदेखील तुमच्या वर्गाध्यापनात वापरून
पहायलाच हवेत.
Thank u sir for sharing.........it is useful for teacher
ReplyDeleteRanjit sir great
ReplyDeleteGreat ! Thanks for sharing
ReplyDeleteYour efforts are noteworthy.You are supossed to join hands with national informatic center
ReplyDeleteIts very helpful for us, thank you for sharing.
ReplyDelete